Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara DCC Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा शंखनाद! प्रारूप यादीपूर्वीच महायुतीचे 'मिशन सहकार' वेगात

Satara DCC Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा शंखनाद! प्रारूप यादीपूर्वीच महायुतीचे 'मिशन सहकार' वेगात

प्रभात 2 weeks ago

Satara DCC Bank Election - ऑक्टोबर 2026 मध्ये होणार्‍या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम आतापासूनच जिल्हाभर घुमू लागले आहेत. 5 ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून विविध मतदारसंघांतून ठराव दाखल करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्हा बँकेच्या 1,764 मतदारांवर आधारित 10 मतदारसंघांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार,

यासाठी महायुतीतील घटक पक्षांसह विरोधकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते मात्र, यावेळी भारतीय जनता पक्षाने अधिकाधिक अनुकूल ठराव आपल्या बाजूने मिळवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मोठी रणनीती आखली आहे.

सहकार क्षेत्रातील प्रभावी संस्थांशी संपर्क वाढवून मतदारसंघनिहाय समीकरणे जुळविण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः सातारा आणि जावळी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मजबूत राजकीय बांधणी सुरू केली असून विरोधकांना सुरुवातीलाच मोठा धक्का देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सहकार वर्तुळात आहे.

दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण-खटाव मतदारसंघात विविध संस्थांच्या माध्यमातून बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी या निवडणुकीत पक्षीय भेद बाजूला ठेवून सहकारातील अनुकूल ठराव मिळविण्यावर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरविणारी मानली जात असल्याने प्रत्येक मतदारसंघात बारकाईने रणनीती आखली जात आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच काही भागांत ठरावांवरून तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी सचिवांवर दबाव आणल्याच्या तक्रारी,

तर काही ठिकाणी अपहरणासारख्या गंभीर घटनांची चर्चा रंगू लागल्याने जिल्हा बँक निवडणुकीची राजकीय लढत अधिकच तापू लागली आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत प्रारूप मतदार यादी, हरकती, अंतिम मतदार यादी आणि उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेदरम्यान जिल्ह्याच्या सहकार राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat