Thursday, 14 Jan, 8.24 am प्रभात

मुख्य बातम्या
सातारा: मोरबाग परिसरातील लोकवस्तीत रानगव्यांचा वावर

ठोसेघर - सज्जनगडाच्या पश्‍चिमेकडील दुर्गम भागातील मोरबाग, ताकवली मुरा, वारसवाडी परिसरातील भरवस्तीत दिवसाढवळ्या रानगव्यांचा मुक्त वावर सुरू आहे. रानगवे शेतातील पिकांचे नुकसान करत असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परळी खोऱ्याच्या दुर्गम भागात मोरबाग, ताकवली मुरा, वारसवाडी ही छोटी गावे वसली आहेत. पायाभूत सुविधांची वानवा असलेला हा परिसर भोवतालच्या घनदाट जंगलाने व्यापला आहे. गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांच्या कळपांनी जंगल सोडून आपला मोर्चा मोरबाग, ताकवली मुरा, वारसवाडी व परिसरातील लोकवस्तीकडे वळवला आहे. गावच्या हद्दीतील पाणवठे, जनावरे चारण्याचा परिसर, रस्त्यांच्या मधोमध, शेतांमध्ये ग्रामस्थांना रानगव्यांचे दर्शन दिवसाढवळ्या वारंवार होत आहे.

त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन कामानिमित्त जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. मोरबाग परिसरातील लोकांचे शेती हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. रानगव्यांचे कळप उभ्या पिकात शिरून पिकांचे नुकसान करत आहेत. गव्यांबरोबर रानडुकरांचाही उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग हतबल व चिंताग्रस्त आहे. वन विभागाने तातडीने आवश्‍यक उपाययोजना करून वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून स्थानिकांना मुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top