Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara News : कोयना नदीपात्रात पाण्याचा वाढता लोंढा; धरणातून ३३ हजार क्युसेक विसर्ग

Satara News : कोयना नदीपात्रात पाण्याचा वाढता लोंढा; धरणातून ३३ हजार क्युसेक विसर्ग

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात गतीने वाढ होत असून धरणातून नदीपात्रात ३३ हजार ८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसाचे माहेरघर ठरलेल्या कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाले- ओढे दुथडी भरून वाहत असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात दाखल होत आहे.

परिणामी धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

आज दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणी पातळी २१५१ फूट ०८ इंच (६५५.८२८ मीटर) इतकी झाली आहे. धरणातील एकूण साठा ९०.०३ टीएमसी (८५.५४ टक्के) तर उपयुक्त साठा ८४.९१ टीएमसी (८४.८० टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे. सध्या धरणात ५९,६४३ क्युसेक इतकी प्रचंड आवक सुरू आहे.

या वाढत्या जलपातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला धरणाचे दरवाजे १ फूटावर उघडण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि आवक सतत वाढत असल्याने प्रशासनाला दरवाजे टप्प्याटप्प्याने वाढवत अखेर ६ फूटांपर्यंत उघडावे लागले आहेत. त्यामुळे कोयना नदीपात्रात सध्या सुमारे ३३ हजार ८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीचा प्रवाह वेगाने वाढताना दिसत आहे.

दरम्यान, नदीपात्रात अचानक वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने इशारा देत नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपातळीवर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन पथकेही अलर्ट मोडवर आहेत.

गेल्या २४ तासांत कोयना येथे १७७ मिमी तर नवजा येथे २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची ही संततधार पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्याने धरणातील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, पावसाचा वाढता जोर, धरणातील वाढती आवक आणि नदीपात्रातील वाढलेला विसर्ग या तिहेरी दबावामुळे कोयना परिसर सध्या सज्ज अवस्थेत असून प्रशासन प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat