Dailyhunt
Satara Zilla Parishad : खटावचा वनवास संपला! १७ वर्षांनंतर तालुक्याला मिळाली 'बंपर लॉटरी'; पाहा कोणाकडे गेली सत्ता?

Satara Zilla Parishad : खटावचा वनवास संपला! १७ वर्षांनंतर तालुक्याला मिळाली 'बंपर लॉटरी'; पाहा कोणाकडे गेली सत्ता?

Satara Zilla Parishad - सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतिपदांच्या निवडणुकीतून खटाव तालुक्याला मिळालेली संधी ही केवळ राजकीय घटना नसून, भविष्यातील विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर तब्बल सतरा वर्षांनंतर खटाव तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदासह दोन महत्त्वाच्या विषय समित्यांची धुरा मिळणे, ही या भागासाठी 'बंपर लॉटरी' ठरली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपने साधलेले हे राजकीय यश 'मास्टर स्ट्रोक' मानले जात असताना, त्याचा सर्वाधिक लाभ खटाव तालुक्याला झाल्याचे स्पष्ट दिसते. खटाव तालुक्याची ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी समृद्ध आहे. दुष्काळी असलेल्या या तालुक्याने अनेक दिग्गज नेते घडवले. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या रूपाने राज्याच्या नेतृत्वात या तालुक्याचा ठसा उमटला. मात्र २००९ च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर खटाव मतदारसंघ रद्द झाला आणि तो कोरेगाव,

कराड उत्तर व माण-खटाव या तीन विधानसभा आणि सातारा माढा या दोन लोकसभा मतदारसंघांत विभागला गेला. यामुळे राजकीय प्रतिनिधित्व विखुरले गेले आणि अपेक्षित विकासाला काही प्रमाणात खीळ बसली. गेल्या काही वर्षांत शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, महेश शिंदे आणि सध्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासारख्या नेत्यांनी तालुक्याचे प्रतिनिधित्व विविध स्तरांवर केले. मंत्रीपदे आणि पालकमंत्री पदे मिळूनही खटावचा सर्वांगीण विकास अपेक्षित गतीने झाला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

मात्र यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेल्या घडामोडींनी या स्थितीत बदल घडवण्याची चिन्हे निर्माण केली आहेत. या नव्या सत्ताकेंद्रामुळे केवळ खटावच नव्हे, तर कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघांनाही विकासाची गती मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पाणी, शेती, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आ. महेश शिंदे यांची प्रभावी रणनीती
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवत सर्वांना धक्का दिला. त्यांच्या निवडीमागे आमदार महेश शिंदे यांची प्रभावी रणनीती आणि राजकीय डावपेच महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर सौ. तेजस्विनी कदम यांना शिक्षण समितीचे सभापतिपद, तर सौ. लता कर्णे यांना कृषी व पशुसंवर्धन समितीचे नेतृत्व मिळाल्याने खटाव तालुक्याला मोठे राजकीय बळ मिळाले आहे.

खटाव तालुक्याला झुकते माप
या यशामागे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले आणि माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे सामूहिक नेतृत्व व समन्वय महत्त्वाचा ठरला. या नेत्यांनी खटाव तालुक्याला झुकते माप देत जिल्हा राजकारणात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat