Sunday, 20 Sep, 5.05 am प्रभात

मुखपृष्ठ
संयुक्‍त राष्ट्राच्या आमसभेत मोदींची दोन भाषणे

न्यूयॉर्क - संयुक्‍त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनानिमित्त पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरिय बैठक आणि सर्वसाधारण चर्चेच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताचा समावेश झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या भाषणांमध्ये कोणता दृष्टीकोन मांडतात, हे विशेष महत्वाचे असणार आहे, असे संयुक्‍त राष्ट्रातील भारताचे राजदूत प्रतिनिधी टी.एस.त्रिमूर्ती यांनी सांगितले.

संयुक्‍त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापन वर्षानिमित्त होणाऱ्या संयुक्‍त राष्ट्राच्या वार्षिक आमसभेला 21 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने संयुक्‍त राष्ट्रातील 193 सदस्य देश एक राजकीय जाहिरनामा प्रसिद्ध करतील. 'भविष्यातील आवश्‍यकता, सामूहिक कटिबद्धतेची फेरनिश्‍चिती ही संयुक्‍त राष्ट्राची गरज' ही या जाहिरनाम्यची संकल्पना असेल.

संयुक्‍त राष्ट्राच्या विशेष आमसभेच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे व्हिडीओ संबोधन होणार आहे. सर्वसाधारण चर्चेसाठीची बैठक 22 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबर होणार आहे. या दरम्यान 26 सप्टेंबर रोजी मोदी यांचा आगोदरच रेकॉर्ड केलेला व्हिडीओ संदेश या बैठकीत दाखवला जाईल, असे त्रिमूर्ती यांनी सांगितले.

संयुक्‍त राष्ट्राच्या जैववैविध्यतेविषयीच्या परिषदेमध्ये 30 सप्टेंबर रोजी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे भाषण होणार आहे. तर 1 ऑक्‍टोबर रोजी बीजिंगमध्ये होणाऱ्या महिला विषयक परिषदेमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे भाषण होणार आहे.

संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताची निवड झाली आहे. भारताच्या सदस्यत्वाचा कालावधी 1 जानेवारी 2022 रोजी सुरू होणार आहे. गेल्याच वर्षी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमातून मोदींनी न्यूयॉर्कमधील भारतीयांना संबोधित केले होते. यावेळी ट्रम्प यांनीही भारतीयांना संबोधित केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top