Tuesday, 17 Sep, 8.55 am प्रभात

मुखपृष्ठ
शिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - मुख्यमंत्री

शिराळा - शिराळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सोबत आता सत्यजित देशमुख ही भाजपमध्ये आल्याने शिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. कोकरूड येथे शिवाजीराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारणार असून आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा वाळवा तालुक्‍यास वरदायी ठरणाऱ्या वाकुर्डे योजनेसाठी पंधरा वर्षे संघर्ष केला.

ती योजना आम्ही पाच वर्षात पुर्णत्वास आणली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कासेगांव येथे महाजनादेश यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मंत्री सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार निरंजन डावरे, माजी आमदार रमेश शेंडगे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, युवा नेते रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात महाजनादेश यात्रेला उर्त्फूत प्रतिसाद मिळत आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील जेष्ठ नेते कै. शिवाजीराव देशमुख हे निष्ठावंत व संयमी नेतृत्व होते. तळागाळातील लोकांशी त्यांची नाळ जोडलेली होती. देशमुख साहेबांनी कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. सत्यजित देशमुख ही आता आपल्या सोबत आले आहेत. त्यामुळे काहीही काळजी करण्याचे काम नाही. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा कमळ फुलणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मतदारसंघात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. शिवाजीराव नाईक यांनी आघाडीच्या काळात शिराळा वाळवा तालुक्‍यातील लोकांना वरदायी ठरणाऱ्या वाकुर्डे योजनेसाठी खास्ता खाल्या आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्षे संघर्ष केला आहे. परंतु युतीचे सरकार येताच आम्ही पाच वर्षांत ही योजना पुर्णत्वास आणली आहे.तर दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पडले.

ते पुढे म्हणाले, पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात पूर्वीच्या सरकारच्या काळात डझनभर मंत्री होते. परंतु कोणीही सिंचन प्रश्नावर तोडगा काढला नाही. आम्ही अनेक सिंचन योजना पाच वर्षात पूर्णत्वास आणून येथील शेतकरी सुजलाम सुफलाम केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 2021 ते 2022 पर्यंत देशात एक ही कुटुंब गरीब व बेघर राहणार नाही.

लोकांची सेवा करताना जात, धर्म, गरीब, श्रीमंत हा भेदभाव न पाहता सर्वांची सेवा अविरत करण्याची शिकवण आम्हाला पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. आम्ही केलेल्या पाच वर्षाच्या काळातील कामाचा आपलाच आशिर्वाद हाच जनादेश समजून येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच भाजपाचा झेंडा रोवणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांच्या उद्योग समुहातील संचालक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले.आभार रमेश गिरी यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top