Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shirur Bazaar Samiti Election: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या समीकरणांची चर्चा

Shirur Bazaar Samiti Election: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या समीकरणांची चर्चा

Shirur Bazaar Samiti Election - शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे केवळ सहकार क्षेत्राचेच नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.

त्यामुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शिरुर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आणि अनेक सहकारी संस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांच्या प्रभावाखाली आहेत.

त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात की एकत्र येतात, यावर समीकरण अवलंबून असणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे; मात्र गट वेगवेगळे लढल्यास भाजप आणि इतर पक्षांना संधी निर्माण होऊ शकते.

आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका, आघाड्या आणि उमेदवारी वाटपावरून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार असून संपुर्ण तालुक्याचे लक्ष आता या घडामोडींवर लागले आहे. गेल्या दोन वर्षांत शिरूर तालुक्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विकास सोसायट्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहेत. एकसंघ राष्ट्रवादी आता दोन गटांत विभागली आहे. त्याचा परिणाम दिसून आला. भाजपकडून तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या रणनितीकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

विरोधकांसमोर आव्हान
शिरुर तालुक्यात सहकार क्षेत्रात सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे. अनेक गावांतील सोसायट्या, सेवा संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधित पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गटाने एकत्रित पॅनल उभे केल्यास विरोधी पक्षांसाठी ही निवडणुक कठीण ठरु शकते.

दोन्ही गटांमध्ये स्थानिक पातळीवर अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत संबंध कायम असल्याने निवडणुकीपूर्वी तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीवर पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat