Monday, 17 Feb, 5.22 am प्रभात

मुख्य पान
स्मार्टफोन व डिजिटल मार्केटींगची वाढ झपाट्याने

नवी दिल्ली - भारतासह जगात आजघडीला डिजिटल मार्केटिंगच्या काही प्रमुख पद्धती चर्चेत असून त्यामध्ये स्मार्टफोनवरुन केले जाणारे मार्केटींगचे अनेक प्रकार लोकप्रिय होत आहेत. सर्वात उत्तम प्रकार म्हणजे लोकप्रिय कंपन्यांच्या साइट्‌सवरून केल्या जाणाऱ्या जाहिराती. गुंतवणूक, यंत्रसामुग्री, वैद्यक यासारख्या विशिष्ट शाखांना वाहिलेल्या नियतकालिकांच्या इंटरनेट आवृत्या सध्या जाहिरातींचं खास माध्यम मानलं जातं. उदा. फोर्ब्स, वॉल स्ट्रीट जर्नल, मॅन्युफॅक्‍चरर्स वीकली. किंवा कार्सच्या उत्पादकांची वेब-पेजेस.

याद्वारे मोठ्या जनसमुदायापर्यंत चटकन पोचता येतंच शिवाय अशा साइट्‌स उघडणारा विशिष्ट वर्ग (टार्गेट ऑडियन्स) बराचसा पूर्वनिश्‍चित असल्याने त्या दृष्टीने विशिष्ट धोरण ठेवून जाहिरातींची आखणी करणं संबंधित मार्केटिंग कंपनीला सोपं जातं. तसंच यामधून ग्राहकाचा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता अधिक असते, असे दिसून आले आहे.

याच श्रेणीतलं दुसरं प्रभावी माध्यम म्हणजे ऍड नेटवर्क. इंटरनेटवरील मार्केटिंगचा हा सर्वात प्रभावी प्रकार मानता येईल. वापरकर्त्याने सर्च घेण्यासाठी टाइप केलेला एखादा शब्द ध्यानात घेऊन त्याच्याशी संबंधित विषयांच्या विविध जाहिराती वेबपृष्ठावर सतत दाखवल्या जातात. यासाठी जाहिरातदार, वापरकर्त्याद्वारे होणाऱ्या, एखाद्या विशिष्ट शब्दाच्या संभाव्य वापराचा अंदाज घेऊन गुंतवणूक करत असतो. यामधला दादा म्हणजे अर्थातच गुगल! गुगलने हा प्रकार जवळजवळ परिपूर्ण स्थितीत नेऊन ठेवला आहे. कारण आपण सर्च घेण्यासाठी गुगलचं इंजिन वापरत असाल तर प्रश्‍नच येत नाही. परंतु अन्य सर्च इंजिनवरूनदेखील गुगलशी संबंधित कंपन्यांच्या (उदा. मॅप्स, शॉपिंग, इमेजेस इत्यादी) जाहिराती दिसू शकतात. 'ऍडवर्डस' हे गूगलचं स्वतःचं नेटवर्कही प्रसिद्ध आहे. मायक्रोसॉफ्ट ऍड नेटवर्क आणि याहू नेटवर्क प्लस याबरोबर क्‍लिक्‍सर, ऍडब्राइट अशीही जाहिरात आणि विपणन केंद्रं उपलब्ध आहेत.

इमेलसोबत दिसणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमामध्येही गुगल आणि याहूदरम्यान स्पर्धा आहे आणि आपणच पहिल्या स्थानावर आहोत, असं दोन्ही कंपन्या सांगत असतात परंतु, इतर प्रकारांमध्ये फारशी न आढळणारी हॉटमेल इथे खूपच आघाडीवर आहे. या तीनही सेवा पुरवठादारांचे सुमारे एक अब्ज वापरकर्ते जगभर आहेत.

सेलफोन किंवा मोबाइल ऍडस्‌ हे आणखी एक महत्वाचं माध्यम. 'स्मार्टफोन'ने संवादक्षेत्रात केवढी मोठी क्रांती घडवली आहे, हे आपण दररोज अनुभवतोच. स्मार्टफोनमार्फत अनेक ऍप्लिकेशन्स उर्फ ऍप्स आणि इ मेल वापरणाऱ्यांची संख्या जगभर दिवसागणिक वाढत आहे. त्यामधूनच आक्रमक मार्केटींग केले जात असल्याने आजचे युग 'डिजिटल मार्केटींग'चे असल्याला पुष्टी मिळते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top