Monday, 26 Aug, 2.01 am प्रभात

शीर्ष बातम्या
सोलापूर जिल्हा तहानलेलाच

दुष्काळसदृश्‍य परिस्थिती कायम ; 352 टॅंकरद्वारे होतोय पाणीपुरवठा
सोलापूर: राज्यात काही जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे वरूणराजाने अद्यापही कृपादृष्टी दाखविलेली नाही. पुणे आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने मायनसमध्ये गेलेले उजनी धरण आज प्लसमध्ये आले आहे. मात्र सोलापूर जिल्हा कोरडाठाक आहे. नद्या दुथडी भरून वाहत असताना 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी सोलापूर जिल्हावासियांची अवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आजमितीला सोलापूर जिल्ह्यात 307 गावे आणि 1655 वाड्यावस्त्यांवरील सुमारे 7 लाख बाधित लोकसंख्येला 352 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्यामध्ये 7 शासकीय आणि सर्वाधिक 51 टॅंकर मंगळवेढा तालुक्‍यात पाणीपुरवठा करत आहेत. उत्तर सोलापूर 23, दक्षिण सोलापूर 29, बार्शी 30,अक्कलकोट 14, माढा 44, करमाळा 49, पंढरपूर 13, मोहोळ 27, सांगोला 48 आणि माळशिरस तालुक्‍यात 24 टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यंदा उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने उसाचे क्षेत्रसुद्धा घटले आहे. शिवाय जनावरांच्या चारा आणि पाण्याचीसुद्धा अडचण होऊन बसल्याने मोहोळ, सांगोला, मंगळवेढा आदी तालुक्‍यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करून त्या ठिकाणी चारा व पाण्याची सोय करावी लागली.

सोलापूर जिल्हा दुष्काळाचा सामना करत आहे. जिल्ह्यात आजमितीला 50 टक्केच पाऊस झाला आहे. आजही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने जिल्हाभरातील बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसासाठी चाचण्या घेण्यात येत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रयोग सुरु आहे. ढगांचा अभ्यास करण्यासाठी विमाने आकाशात घिरटयासुद्धा मारत आहेत. अभ्यासासाठी टीम सोलापूर विमानतळावर अनेक दिवसांपासून तैनातसुद्धा आहे. मात्र कृत्रिम पावसाचे नियोजन अद्यापही झालेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top