Solapur - अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आला आणि पाण्याचे लोंढे थेट गावात शिरले. गावातील वेशीपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, तर धनगर गल्लीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली.
यामुळे नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून काशिविश्वेश्वर मंदिरात आश्रय घ्यावा लागला. फरशी ओढ्यावरून पाणी वाहत असल्यामुळे जेऊर ते अक्कलकोट आणि स्टेशनकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. या जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
यामुळे केळी, ऊस, तूर, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. माढा तालुक्यातील वडशिंगे येथे पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पाच जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढून वाचवले. माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या पावसाने थैमान घातले. बार्शी ते तुळजापूर राज्यमार्गावर झाड पडल्याने मार्ग वाहतुकीसाठी रात्री बंद झाला.
कुईवाडी-बार्शी रस्त्यावरुन माढा मार्गे येत असताना इनोव्हा गाडी रात्री दोनच्या सुमारास गावानजीकच्या ओढ्यातून पाण्यात वाहून जात पुढे अडकली. यात पाच जण प्रवास करत होते. आनंद बगली आणि आणखी एक असे दोघे सोलापूर येथील तर सचिन शिराळ, रणजित चिंबल, सुशांत शिवशरण हे तिघे मोहोळचे रहिवासी प्रवास करत होते.
रात्री दोनच्या सुमारास वडशिंगे येथील ग्रामस्त तातडीने वाहन वाहून गेलेल्या ठिकाणी पोहचले. वाहनात अडकलेल्यापर्यंत दोरखंड व साखळी बांधत ते पोहचले. अडकलेल्या पाच जणांना ग्रामस्थांनी वाचवले.रविवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. माढा बार्शी, माढा वैराग रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

