Soman Rana Gold and Shubham Juyal Silver Medal wins Shot Put F57 CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2026) भारतीय ॲथलीट्सनी आपला दबदबा कायम राखला आहे.
पॅरा ॲथलेटिक्सच्या पुरुषांच्या गोळाफेक (Shot Put F57) अंतिम सामन्यात भारताच्या सोमन राणाने (Soman Rana) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. तर भारताच्याच शुभम जुयालने (Shubham Juyal) रौप्यपदकावर (Silver Medal) कब्जा केला. राष्ट्रकुलच्या इतिहासात या क्रीडा प्रकारात भारताचे हे पहिलेवहिले सुवर्णपदक आहे, तसेच भारताने एकाच वेळी अव्वल दोन स्थानांवर झेप घेत ‘डबल पोडियम फिनिश’चा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
दोन्ही भारतीयांचा मैदानावर थरार!
१० खेळाडूंच्या या अंतिम सामन्यात सोमन राणा आणि शुभम जुयाल यांनी सर्वात शेवटी आपले थ्रो केले. शुभम जुयालने सुरुवातीलाच १३.०८ मीटरचा थ्रो करत अव्वल स्थान मिळवले होते. त्याचा शेवटचा थ्रो १३.२८ मीटरचा होता. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या सोमन राणाने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात १३.४० मीटर अंतरावर गोळा फेकत शुभमला मागे टाकले आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या दोन पदकांसह चालू राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या ३० वर पोहोचली आहे.
बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता: लँडमाइन अपघाताची कहाणी!
सोमन राणाचा हा सुवर्णप्रवास थक्क करणारा आणि अंगावर काटा आणणारा आहे. भारतीय लष्कराच्या २/८ गोरखा रायफल्समध्ये (2/8 Gorkha Rifles) सिपाही असलेला सोमन हा २००५ मधील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ५ व्या क्रमांकावर राहिलेला देशातील एक उत्कृष्ट मिडिलवेट बॉक्सर होता. मात्र, २००६ मध्ये पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या एका भयंकर लँडमाइन ब्लास्ट (Landmine Blast) अपघातात त्याने आपला उजवा पाय गमावला.
या दुर्दैवी अपघातानंतर खचून न जाता, २०१७ मध्ये कृत्रिम पाय (Artificial Limb) बसवण्यासाठी तो जेव्हा आर्मी पॅरालंपिक नोडवर गेला, तेव्हापासून त्याने पॅरा ॲथलेटिक्सला सुरुवात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य आणि आशियाई खेळांमध्ये रौप्य जिंकणारा सोमन आता राष्ट्रकुल स्पर्धेत देशाचा ‘गोल्डन बॉय’ बनला आहे.

