Monday, 22 Jul, 7.22 am प्रभात

महाराष्ट्र
स्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड

पावणेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच संशयित अटकेत

सातारा - सांगली जिल्ह्यात घरफोड्या, दरोडे टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. एकूण 85 घरफोड्या केल्याची कबुली अटकेतील संशियतांनी दिली असून त्यांच्याकडून 34 घरफोड्यातील 14 लाख रूपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जावेद अनिल काळे (रा. फडतरवाडी, ता. खटाव), करण वरिसऱ्या काळे (रा. भांडेवाडी, ता. खटाव), निकाल लत्या काळे (रा.कोकराळे, ता. खटाव), संकेत आलीशा काळे, अभिजीत मंज्या काळे (दोघे रा. सिध्देश्‍वर कुरोली, ता. खटाव), ऋतुराज भावज्या शिंदे (रा. काटकरवाडी, ता. खटाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. खटाव तालुक्‍यातील मांडवे, सिध्देश्‍वर कुरोली, पुसेसावळी येथे जून 2019 मध्ये याच संशयितांनी दरोडे टाकले होते.

तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखा संशयितांच्याकडे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा कसून तपास करत होती. तब्बल एक महिन्याच्या तपासानंतर अटकेतील संशयितांनी सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, कोरेगाव तर सांगली जिल्ह्यात मिळून एकूण 85 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांच्याकडे कसून चौकशीला सुरूवात केली. तपासादरम्यान संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एलसीबीच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून संशयितांच्याकडून 85 घरफोड्या केल्याची कबुली व त्यातील 34 घरफोड्यांतील एकूण सहा लाख 80 हजार रूपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने, 40 हजार रुपये किंमतीची एक किलो चांदी, मोबाइल, महागडी घड्याळे, दुचाकी असा सुमारे 13 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, संजय जाधव, विजय सावंत, वडूज पोलीस ठाण्याचे सुदाम ओंबासे, देवकुळे, अर्जुन खाडे यांनी केली.

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
अटकेतील संशयितांच्याकडून एलसीबीने 85 घरफोड्या उघड करून त्यातील 34 घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल 20 तोळे सोने व एक किलो चांदी तसेच महागडी घड्याळे, मोबाइल, दुचाक्‍या जप्त केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात जिल्हा पोलीस दलाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

तब्बल एक महिना चालला तपास
जून महिन्यात खटाव तालुक्‍यात दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांसह एसलीबीला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून ते संशयित सापडेपर्यंत 'एलसबी'ची टीम गेला एक महिना तपासाचे काम अविरतपणे करत होती. अखेर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करूनच एलसीबीने आपले काम थांबवले.

उघडकीस आलेले घरफोड्यांचे गुन्हे
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9, वडूज पोलीस ठाणे 28, पुसेगाव पोलीस ठाणे 16, कोरेगाव पोलीस ठाणे 6, म्हसवड पोलीस ठाणे 14, दहिवडी पोलीस ठाणे 1, विटा पोलीस ठाणे (जि.सांगली) येथे 1 गुन्हा असे एकूण 85 घरफोडीचे गुन्हे अटकेतील संशयितांच्यावर दाखल आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top