Thursday, 21 Jan, 5.40 pm प्रभात

मुख्य बातम्या
Stock Market Today : शेअर बाजारात नफेखोरी वाढली ; सेन्सेक्‍स 50,000 अंकाला धडक देऊन परतला

Stock Market Today - शेअर बाजार निर्देशांक कमालीचा उच्च पातळीवर असल्यामुळे दुपारच्या सत्रात शेअर बाजारात बरीच नफेखोरी झाली. त्यामुळे निर्देशांक कालच्या तुलनेत कमी पातळीवर बंद झाले. मात्र दरम्यानच्या काळात सकाळी जोरदार खरेदी होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स काही काळ 50 हजार अंकांच्या पुढे गेला होता.

जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही दुपारी भारतीय शेअर बाजारात बरीच विक्री झाली. नफ्यासाठी गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बॅंक, एअरटेल, स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, सनफार्मा, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरची विक्री केली. मात्र या परिस्थितीतही बजाज फायनान्स, बजाज ऑटो, रिलायन्स, बजाज फिन्सर्व्ह, एशियन पेंट्‌स या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली.

प्रचंड उलथापालथीनंतर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 167 अंकांनी म्हणजे 0.34 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 49,624 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 54 अंकांनी कमी होऊन 14,590 अंकांवर बंद झाला. दरम्यान रुपयाचे मूल्य सहा पैशांनी वाढून 72.99 रुपये प्रति डॉलर या उच्चांकी पातळीवर गेले.

निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहून व्यवहार करण्याचा सल्ला बरेच विश्‍लेषकांनी अनेक दिवसांपासून देत आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील सकारात्मक स्थिती आणि चीनमधील वाढीव विकास दरामुळे निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. मात्र सध्याच्या पातळीवर गुंतवणूकदार आणखी खरेदी करण्यास तयार दिसत नाहीत.

बाजारातील आजच्या घडामोडीबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल म्हणाले की, काही प्रमाणात नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकात घट झाली असली तरी कंपन्यांचे चांगले ताळेबंद, भांडवल सुलभता, लसीकरण व कमी पातळीवरील व्याजदरामुळे आगामी काळात निर्देशांक आगेकूच करण्याची शक्‍यता आहे.

एम्के वेल्थ मॅनेजमेंटचे संशोधन प्रमुख जोसेफ थॉमस यांनी सांगितले की, निर्देशांक 50हजार अंकाच्या जवळपास गेल्यानंतर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र एकूण परिस्थिती सकारात्मक असल्यामुळे आणि सर्वच कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत असल्यामुळे निर्देशांकांना चांगला आधार मिळत आहे. अँजेल ब्रोकिंगचे वरिष्ठ विश्‍लेषक रचित जैन यांनी सांगितले की निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे खरेदी-विक्रीच्या लाटा येणे साहजिक आहे.निर्देशांकांना 14,500 अंकावर चांगला आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top