Sunetra Pawar: काँग्रेसने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर होत्या.
त्यांनी बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावली.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. बीडमधील पत्रकार परिषदेदरम्याचा एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर ही टीका करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. (Sunetra Pawar)
यावेळी पत्रकाराने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं. या व्हिडिओवरून काँग्रेसने सुनेत्रा पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ‘धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा?’, ‘सुनेत्रा पवार अजून किती दिवस 'गुंगी गुडिया' बनून राहतील,’ असं म्हणत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. (Sunetra Pawar)
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी "गुंगी गुडिया" असा शब्दप्रयोग केल्याची बाब अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. Sunetra Pawar
नेमकं काय म्हणाले उमेश पाटील? (Sunetra Pawar)
“भारतीय राजकारणाच्या इतिहासात हा शब्दप्रयोग प्रथमच ऐकायला मिळालेला नाही. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती.
मात्र इंदिरा गांधी यांनी कोणालाही शब्दांनी नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले. बांगलादेश मुक्तिसंग्रामातील नेतृत्व, निर्णायक निर्णयक्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेमुळे त्या जागतिक स्तरावर प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या. त्या काळानंतर त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक विविध राजकीय नेत्यांनीही केले.
काँग्रेस एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? (Sunetra Pawar)
आज प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळात अन्यायकारक व महिलेचा अवमान करणारी टीका मानले होते, त्याच शब्दप्रयोगाचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे?,” असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे.
“याचा अर्थ काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे हे मान्य करत आहे का की स्व. इंदिरा गांधी यांच्यावरील त्या काळातील टीका योग्य होती? हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही, तर सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संस्कृतीचा आहे. Sunetra Pawar
आमचा स्पष्ट विश्वास आहे की, लोकशाहीत मतभेद असू शकतात, धोरणांवर कठोर टीका होऊ शकते; परंतु महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही,” अशा शब्दात उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला खडसावले आहे.
तसेच काँग्रेसने संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा जपावी, अशी अपेक्षा उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

