Monday, 23 Sep, 11.56 am प्रभात

मुख्य पान
सुपे येथील नैसर्गिक ओढा बुजविला

भाजपचे पुणे जिल्हा चिटणीस आर. एन. जगताप यांचा उपोषणाचा इशारा

सासवड - सुपे (ता. पुरंदर) येथे एका उद्योजकाने नैसर्गिक ओढाच बुजविला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सुपे गावातील गट नंबर 717 व 718 या शेतजमिनीत विशाल छुगेरा या उद्योजकाने खासगी प्लॉटिंग केली असून याठिकाणी घोरवडी जलाशयातून येणारा नैसर्गिक ओढाच बुजविण्याचा घाट घातला आहे. याविरोधात पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांच्याकडे भाजपचे पुणे जिल्हा चिटणीस आर. एन. जगताप यांनी तक्रार केली आहे. तसेच विशाल छुगेरा यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवून सदर ओढा पूर्ववत न केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचाही इशारा जगताप यांनी दिला आहे.

या प्रकरणी सुपे येथील गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात काम बंद ठेवले जाते आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी पुन्हा ओढा बुजविण्याचे काम केले जात असल्याची तक्रार जगताप यांनी केली आहे. सदर प्रकरणातील उद्योजकावर पुरंदरचे माजी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी कार्यवाही केली होती. मात्र, म्हेत्रे यांची बदली झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशी ओढा पुन्हा बुजविण्यात येत आहे. यापूर्वी मंडल अधिकारी दत्तात्रय गवारी व भिवडीच्या तलाठी निलम कांबळे यांनी मे 2019 मध्ये याच प्रकरणात पहिली कारवाई केली होती. मात्र, अवघ्या एका महिन्यात पुन्हा जून 2019 मध्ये ओढा बुजविण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर पुन्हा तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून छुगेरा यांच्या विरोधात गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल केला होता.

सुपे येथील सदर प्रकरणातील ओढा हा घोरवडी जलाशयातून येणारा असून ओढ्याला पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. यामुळे आजूबाजूच्या भागातील ओढ्या-नाल्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी असते. हेच पाणी पुढे कऱ्हा नदीला मिळते. घोरवडी जलाशय भरल्यानंतर जवळपास पाच ते सहा महिने या ओढ्यांना पाणी वाहत असते. मात्र, सदर उद्योजकाने ही जमीन खरेदी केल्यानंतर गावची स्मशानभूमी ते प्राथमिक शाळेपर्यंतचा या ओढ्याचा मार्गच बदलला आहे. या ओढ्याची रुंदी 100 ते 130 फूट असून लांबी 2 हजार फूट इतक्‍या भागांमध्ये हा ओढा पूर्णपणे बुजविलेला आहे. ओढ्यात सिमेंटचे पाईप टाकून ओढ्याची रुंदी कमी केली आहे. या बाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संबंधित उद्योजकाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सदर उद्योजकास काम थांबविण्याची कायदेशीर नोटीस बजावली असून ओढा पूर्ववत करण्याचे आदेशही दिले आहेत. जर या ठिकाणी काम चालू असल्याचे आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
- रूपाली सरनौबत, तहसीलदार पुरंदर


सुपे येथील ओढा बुजविल्याप्रकरणी सदर उद्योजकांवर पुरंदरचे तहसीलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करून या ठिकाणचे काम त्वरित थांबवावे व ओढा पूर्ववत करण्यास सांगावे. जर आठ दिवसांत ओढा पूर्ववत झाला नाही तर पुरंदर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.
- आर. एन. जगताप, चिटणीस पुणे जिल्हा भाजप

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top