Wednesday, 21 Apr, 1.32 pm प्रभात

ताज्या बातम्या
स्वयंचलित ऑक्‍सिजन प्रणालीद्वारे "श्‍वास'

'डीआरडीओ'ने विकसित केली यंत्रणा : रुग्णांसह सैनिकांनाही उपयुक्‍त

पुणे - करोनाग्रस्तांसाठी ऑक्‍सिजन बेडच्या कमतरतेवर पर्याय म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) एसपीओ-2 पूरक ऑक्‍सिजन वितरण प्रणाली विकसित केली आहे. ही स्वयंचलित यंत्रणा उपयुक्‍त असल्याचा दावा डीआरडीओने केला आहे.

शहरात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. अनेकांना 'ऑक्‍सिजन बेड'ची गरज भासत आहे. मात्र वाढत्या मागणीअभावी ही ते उपलब्ध होऊ न शकल्याने रुग्ण आणि नातेवाइकांना बरीच धावपळ करावी लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून डीआरडीओच्या बंगळुरू येथील डिफेन्स बायो-इंजिनिअरिंग आणि इलेक्‍ट्रो मेडिकल प्रयोगशाळा (डीईईबीईएल) येथे ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

संस्थेच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, 'ही प्रणाली प्रामुख्याने अतिशय कमी ऑक्‍सिजनचे प्रमाण असलेल्या उंच प्रदेशात तैनात असलेल्या सैनिकांसाठी विकसित करण्यात आली आहे. तेथे ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे सैनिकांना 'हायपोक्‍सिया' होण्याचा धोका असतो. या स्थितीमध्ये शरीरातील प्राणवायू ऊतींपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे शरीरासाठी आवश्‍यक ऊर्जा तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. करोना रुग्णात तयार होणारी हीच परिस्थिती आहे. त्यामुळेच संस्थेने विकसित केलेली ही स्वयंचलित प्रणाली करोना रुग्णांसाठी उपयुक्‍त ठरेल.'

अशी काम करते प्रणाली
ही प्रणाली वायरलेस इंटरफेसद्वारे मनगटावर परिधान केलेल्या ऑक्‍सिमीटरच्या साह्याने व्यक्‍तीच्या शरीरातील एसपीओ 2 च्या स्तरांचे वाचन करते. व्यक्‍तीच्या शरीरात ऑक्‍सिजन पुरवठा नियमित करण्यासाठी प्रमाणित सोलेनॉइड झडप नियंत्रित करते. तसेच या उपकरणाच्या साह्याने नाकाद्वारे ऑक्‍सिजन शरीरात सोडला जातो. या प्रणालीचे इलेक्‍ट्रॉनिक हार्डवेअर अत्यंत उंचीवर कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यामध्ये कमी बॅरोमेट्रिक दबाव, कमी तापमान आणि आर्द्रता यांचा समावेश आहे.

यंत्राची वैशिष्ट्ये
अतिगंभीर नसलेल्या रुग्णांसाठी ऑक्‍सिजन फ्लो थेरपीसाठी नियंत्रित प्रवाहासह वापरली जाऊ शकते.
डॉक्‍टर आणि पॅरामेडिक्‍सचा कामाचा भार कमी होण्यास मदत.
2, 5, 7, 10 एलपीएम प्रवाह दराने ऑक्‍सिजन प्रवाह नियंत्रित करता येतो.
वापरण्यासाठी सुलभ, आर्थिकदृष्ट्या परवडणारी प्रणाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top