Tuesday, 22 Oct, 8.29 am प्रभात

मुखपृष्ठ
टक्केवारी वाढल्याने कर्जत-जामखेडमध्ये धाकधूक

जामखेड - कर्जत-जामखेड विधासभा मतदार संघापैकी जामखेड तालुक्‍यात यंदा विक्रमी मतदान झाले. या मतदार संघात चुरशी लढत झाली असून तब्बल 71.34 टक्‍के मतदान झाले. 2 लाख 28 हजार 341 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क आहे. मतदारसंघात भाजपचे प्रा. राम शिंदे तर राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांच्यात दुरंगी लढत झाल्यामुळे कोण जिंकणार याबाबत अंदाज बांधणे आव्हानत्मक ठरत आहे.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात 71.34 टक्के मतदान झाले. सकाळी आठ वाजता पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चौडी येथे प्रथम अहिल्यादेवी यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन कुटुंबातील आई, वडील, पत्नी, दोन मुली यांच्या सोबत मतदान केले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते व उमेदवार रोहित पवार यांनी आज सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी पिंपरी तालुका बारामती येथील मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी तालुक्‍याच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व निवडताना सर्व बाजूंनी विचार करून मतदान केल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगताना दिसून आली.

रोहित पवार व आ. राम शिंदे या उमेदवारांनी प्रचारात कसलीही कसर सोडली नाही.मात्र, शेवटच्या दोन-तीन दिवसांत काही उमेदवार बदलत्या परिस्थितीप्रमाणे नियोजन, कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्यात यशस्वी ठरले. दरम्यान सकाळी प्रा. शिंदे व पवार यांनी मतदान केंद्रावर जाऊन भेटी दिल्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत अवघे 2 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान वाढायला सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70.62 टक्‍के मतदान झाले. काही ठिकाणी सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे निवडणूक विषयक ट्रेंड बदलत असल्याचे लक्षात आले. मतदान करणाऱ्यांमध्ये सुशिक्षित मतदारांचे प्रमाण अधिक होते. सकाळीपर्यंत मतदानाला अतिशय अल्प प्रतिसाद असूनही शेवटच्या सत्रात मात्र मतदारांनी मतदानासाठी रांगा लावून मतदान केले. तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये मतदानासाठी नागरिक येत असून मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती.

नवमतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे दिसत होते. विशेषतः महिला वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला होता. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी तालुक्‍यातील मूलभूत नागरी समस्यांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. सर्वच विरोधकांनी प्रा. शिंदे यांना लक्ष्य करून त्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांची यादी मतदानाच्या आधी पुस्तक रूपात घरोघरी पोहोचवून विरोधकांचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला होता. ना. शिंदे यांची व्होट बॅंक असलेला 'माधव'मतदार या निवडणुकीत त्यांच्यापासून दुरावल्याची चर्चा मतदान केंद्रावर होताना दिसत होती. पवार यांनी प्रभावीपणे प्रचारयंत्रणा राबवल्याची चर्चा तालुक्‍यात होती.

या मतदारसंघात विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजनसह 9 उमेदवारांचे भवितव्य आज मतयंत्रात बंद झाले. मतदारसंघात सध्या शांततेत मतदान सुरु असून कुठे ही अप्रिय घटना घडलेली नाही.काही ठिकाणी मतदारांना नाव शोधण्यासाठी कसरत करावी लागत होती. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे नावे दोन वेगवेगळ्या केंद्रावर होते. मतदारांना आणण्यासाठी उमेदवाराकडून रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी मशिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतदान प्रक्रियेस विलंब लागत आहे. मात्र, असे असताना मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.

विक्रमी मतदान

3 लाख 20 हजार 64 मतदारांपैकी 2 लाख 28 हजार 341 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विक्रमी 71.34 टक्के मतदानाची नोंद झाले असून पुरुष मतदार 1 लाख 16 हजार 35 तर महिला मतदार 1 लाख 3 हजार 650 असे एकूण 2 लाख 28 हजार 341 मतदारांनी मतदान केले. यामध्ये युवकांचे मतदान लक्षणीय होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top