Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल 1700 पदांसाठी तलाठी भरती होणार असून, प्रशासनाने सर्व विभागीय आयुक्तांना 8 मेपर्यंत मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत घेतली जाणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सरळ सेवा भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता सरळसेवेतील पदेही एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. पारदर्शकता वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
सरळसेवेमधील सुमारे 46 पदांचा समावेश या प्रक्रियेत करण्यात आला असून, शिक्षक आणि पोलिस भरतीला मात्र यामधून वगळण्यात आले आहे. या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) 5 मे रोजी जारी करण्यात आला आहे. याशिवाय, गट ब, गट क आणि गट ड पदांसाठी घेतली जाणारी मुलाखतही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
तसेच एसटीआय, एएसओ आणि पीएसआय पदांसाठी एमपीएससीमार्फत 14 जून रोजी पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण 552 जागांसाठी ही परीक्षा होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे निश्चित करण्यात आली आहे.

