Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tamarind Panna: कडक उन्हात उष्माघातापासून बचाव करणार 'चिंचेचं पन्हं'; शरीराला देईल त्वरित थंडावा

Tamarind Panna: कडक उन्हात उष्माघातापासून बचाव करणार 'चिंचेचं पन्हं'; शरीराला देईल त्वरित थंडावा

Tamarind Panna: देशभरात सध्या प्रचंड उकाडा आणि उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकांना डिहायड्रेशन, थकवा आणि उष्माघाताचा त्रास होत आहे. अशा वेळी शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा टिकवून ठेवणारे पारंपरिक पेय म्हणजे 'चिंचेचं पन्हं'.

राजस्थानमध्ये अनेक वर्षांपासून हे पेय उन्हाळ्यात आवर्जून बनवले जाते. चवदार असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. (Tamarind Panna)

आयुर्वेदानुसार चिंचेचं पन्हं शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते. या पेयात वापरले जाणारे नैसर्गिक घटक शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत. त्यामुळे उष्णतेमुळे होणारा थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत मिळते. चिंचेचा आंबट-गोड स्वाद शरीराला ताजेतवाने करतो आणि उष्णतेपासून आराम देतो.

चिंचेच्या पन्ह्यात चिंच, गूळ, काळं मीठ, भाजलेलं जिरेपूड, काळी मिरी आणि पुदिना वापरला जातो. चिंच शरीराला थंडावा देते, तर काळं मीठ आणि जिरे पचन सुधारण्यास मदत करतात. पुदिन्यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो आणि गुळामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. त्यामुळे हे पेय उन्हाळ्यात शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरते. (Tamarind Panna)

चिंचेचं पन्हं बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. सर्वप्रथम दोन मोठे चमचे चिंच कोमट पाण्यात काही वेळ भिजत ठेवावी. चिंच मऊ झाल्यानंतर ती चांगली मॅश करून त्याचा रस काढावा. त्यानंतर त्यात गूळ किंवा खडीसाखर, काळं मीठ, भाजलेलं जिरेपूड आणि थोडी काळी मिरी घालावी. नंतर त्यात थंड पाणी मिसळून बर्फाचे तुकडे घालावेत. शेवटी ताज्या पुदिन्याच्या पानांनी सजवून हे पेय सर्व्ह करावे. (Tamarind Panna)

उन्हाळ्यात सतत घाम येत असल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक मिनरल्स कमी होतात. अशा वेळी चिंचेचं पन्हं शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हे पेय केवळ तहान भागवत नाही, तर शरीराला थंडावा देऊन ऊर्जा टिकवून ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून (Dehydration) बचाव करण्यासाठी चिंचेचं पन्हं हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, घरगुती आणि नैसर्गिक पेयांचा वापर केल्यास शरीराला रासायनिक पेयांपेक्षा अधिक फायदा होतो. त्यामुळे या उन्हाळ्यात थंडगार चिंचेचं पन्हं पिऊन स्वतःला निरोगी आणि फ्रेश ठेवता येऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat