Sunday, 15 Dec, 1.41 am प्रभात

मुखपृष्ठ
ठाकरे सरकारची उद्यापासून पहिली परिक्षा

- हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्‍यता
- मेट्रो कारशेड व प्रकल्पांना दिलेल्या स्थगितीवरून अधिवेशन गाजणार

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार, 16 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. मुंबईत तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेल्यानंतर नागपूर येथील अधिवेशन म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची पहिली परिक्षा ठरणार आहे. अवकाळी पाऊस व जुलै, ऑगस्ट महिन्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. मात्र, विरोधकांचे डावपेच उधळून लावण्यासाठी सरकारकडून या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळात सहा कॅबिनेट मंत्री आहेत. या सहा मंत्र्यांवर भीस्त ठेवून ठाकरे प्रथमच अधिवेशनाला सामोरे जात आहेत. पहिल्याच अधिवेशनात सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनिती आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मेट्रोरेल प्रकल्पाच्या आरेतील कारशेड तसेच नगरविकास आणि ग्रमविकास विभागाच्या निधीतील कामांना स्थगिती दिली आहे. याशिवाय कारशेडसाठी पर्यायी जागा तसेच आरेतील वृक्ष कत्तलीच्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमली. या निर्णयावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्‍यता आहे. तसेच शेतकरी मदत आणि कर्जमाफी मुद्यावरून सरकारला विरोधकांच्या तोफखान्यासमोर उभे रहावे लागणार आहे.

राज्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारने आधीच्याच निकषाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यामुळे विरोधी पक्ष 25 हजाराच्या मदतीचा मुद्दा उचलून धरणार असल्याचे समजते.

मंत्रिमंडळाच्या तात्पुरत्या खातेवाटपात ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन विभागाशिवाय कोणतेही खाते ठेवले नाही. त्यामुळे सभागृहात उपस्थित होणाऱ्या बहुतांश मुद्यांना कॅबिनेट मंत्री उत्तर देतील. तथापि, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात ठाकरे आपला 'रोडमॅप' दोन्ही सभागृहासमोर मांडू शकतात.

भाजप चहापानाचे निमंत्रण स्विकारणार का?
परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सरकारच्या चहापान कार्यक्रमाला विरोधकांनी उपस्थित राहण्यासाठी सरकारकडून निमंत्रण दिले जाते. उद्या रविवारी हा चहापान कार्यक्रम आहे. त्यामुळे विरोधकांना निमंत्रण देण्यासाठी सरकारच्या वतीने कोण जाणार आणि विरोधक सरकारच्या चहापान कार्यक्रमाला जाणार की बहिष्कार टाकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता या नात्याने अधिवेशनावर छाप पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

अधिवेशनात प्रश्नोत्तरे नाहीत
नागपूर अधिवेशनात तारांकीत प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. प्रश्नोत्तरे नसलेले हे बहुधा पहिलेच अधिवेशन असावे. अधिवेशनगात पुरवणी मागण्या, लक्षेवधी सूचनांसह शासकीय विधेयके तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव चर्चेला येईल. तसेच दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे सूप 21 डिसेंबरला वाजणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top