Thursday, 14 Oct, 11.53 am प्रभात

मुखपृष्ठ
थरार! 'धनुष्यबाणानं' ५ लोकांची केली हत्या; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

ओस्लो : हत्या करण्यासाठी एखादी व्यक्ती कशाचा वापर करेल याचा आजकाल काही नेम राहिला नाही. कारण दक्षिणपूर्व नॉर्वेमध्ये चक्क धनुष्यबाण घेऊन एका लेंसच्या सहाय्याने ५ लोकांची हत्या करण्यात आली आहे. तर या घटनेत २ जण जखमी झाले. या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोंग्सबर्ग शहरात विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यामागे काय उद्देश होता? याबाबत स्पष्टता नाही. परंतु दहशतवादी हल्ला असण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेबाबत पोलीस अधिकारी ओविंद आस यांनी ५ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तर दोघांची अवस्था गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सध्या त्यांच्या जीवावरील धोका टळल्याची माहिती दिली आहे.

जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तो ऑफ ड्युटी असताना एका स्टोअरवर त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेत सहभागी असणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा संशयित कोंग्सबर्ग शहरात राहणारा ३७ वर्षीय डेनिश नागरिक असल्याची ओळख पटली आहे.

रिपोर्टनुसार, हल्लेखोर नॉर्वेचा व्यक्ती होता. हल्ल्यासाठी त्याने धनुष्यबाणाचा वापर केला. या हल्ल्यात आणखी कोणतं हत्यार वापरण्यात आलं होतं का? पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने एकट्यानेच हा हल्ला घडवल्याचं सांगण्यात येत आहे. नॉर्वेत कदाचित अशी हिंसक घटना पाहायला मिळाली असेल. १० वर्षापूर्वी कट्टरपंथी एंडर्स बेहरिंग ब्रेविकने द्वितीय विश्वयुद्धानंतर देशात सर्वात भीषण हिंसाचार घडवला होता. त्यावेळी जवळपास ७७ लोकांची हत्या करण्यात आली होती.

हल्लेखोराने कूप एक्स्ट्रा सुपरमार्केटमध्ये घुसून लोकांवर हल्ला केला. सुरुवातीला त्याने शहरातील गर्दीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांना निशाणा बनवलं. त्यानंतर त्याने जवळच्या परिसरात पळ काढला. आरोपीचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि बॉम्ब स्क्वॉडला तैनात केले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोरोला घटनास्थळापासून २५ किमी अंतरावरील ड्रेमन परिसरात पकडण्यात पोलिसांना यश आले . त्यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. कोंग्सबर्गच्या टाऊन सेंटरवर अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा उद्देश सध्या अस्पष्ट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top