काँग्रेसने पोटनिवडणूक माघारीसाठी ठेवली मोठी अट
Top 10 News : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वत: बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
महायुतीकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरुवातीपासून करण्यात आले होते. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवाराचे नाव जाहीर केले. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर ही उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसने मोठी अट ठेवली असून त्यात जर राज्यसरकारने अजित पवार यांच्या विमान अपघाताचा गुन्हा नोंदवून घेतला तर पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्यात येईल असं म्हटलंय. त्यामुळे आता महायुती सरकार काँग्रेसची ही अट मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार
दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर विविध राज्यांतील दिग्गज नेते आज शपथ घेणार असून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले , तसेच रामराव वडकुते , माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे आज शपथ घेणार आहेत. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन या नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत पाऊल ठेवतील. विनोद तावडे 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे आहे. तर पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली आहे. पार्थ पवार 9 एप्रिलला शपथ घेणार असल्याचं म्हटलं जातंय.
आणखी एक महिला अधिकारी रडारवर
भोंदू अशोक खरात प्रकरणात अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता या प्रकारणात एक महिला अधिकारी रडारवर आहेत. SIT तपासात याबाबत माहिती उघड झाली आहे. दरम्यान, या माहितीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. SIT तपासात या तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा भोंदू अशोक खरातशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू अशोक खरातला मदत केल्याचा संशय आहे. त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला पाहिजे असलेली पोस्टिंग मिळवून दिली आहे. या महिला अधिकाऱ्याचे काळे पैसे देखील खरातने पांढरे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढेंनी समाजासमोर ठेवला नवा आदर्श
दोन दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते आपला प.बंगालचा दौरा सोडून बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी पोहोचले होते. याच गावी त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर, पुढील पारंपरिक विधी न करता तुकाराम मुंढेंनी विज्ञान आणि विवेकवादी विचार जपत आदर्श निर्माण केलाय. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर तुकाराम मुंढेंनी तिसऱ्याच दिवशी सर्व विधी पूर्ण केले, तसेच अस्थींचे विसर्जन नदीत न करता, आपल्यातच शेतात खड्डा खोदून, तिथे वडाचे झाड लावून पूर्ण केले. मुंढे यांनीच याबाबत सोशल मीडियात पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी ”आमच्या "बाईंच्या" (आईच्या) स्मृतीप्रत्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा, संवेदनशील व विवेकवादी निर्णय मुंढे परिवारातर्फे घेतला आहे. "निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे." या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय.
'या' लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ Top 10 News :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी झाली आहे. पात्र लाडक्या बहिणींनाच दरमहा १० तारखेपूर्वी १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता ३० एप्रिलपर्यंत 'ई-केवायसी'तील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मे महिन्यापासून निकषांत अपात्र ठरलेल्या सर्व महिलांचा लाभ कायमचा बंद होईल, असे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून सांगण्यात आले.राज्यातील अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये सुद्धा नाही, यावर प्रश्न उपस्थित झाला.मात्र, जूनअखेर जाहीर झालेल्या योजनेचे अर्ज सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आले आणि पुढे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामुळे पडताळणी होऊ शकली नाही. त्यानंतर लाभार्थींची योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार पडताळणी करण्यात आली. त्यात अपात्र कोण ठरले, कोणाचा लाभ बंद झाला, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र, मे महिन्यात ज्यांना १५०० रुपये येणार नाहीत त्या महिला निकषांत अपात्र ठरल्या, असे समजावे लागेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता एका वर्षाच्या नोकरीतही मिळणार ग्रॅच्युइटी
नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन लेबर कोडनुसार ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता फक्त एका वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार आहे. याआधी यासाठी किमान 5 वर्षांची अट होती. नवीन नियमांनुसार 'फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी' म्हणजेच ठराविक कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थेट कंपनीच्या पेरोलवर घेतलं जाणार आहे. यामुळे त्यांना पगार, सुट्ट्या आणि भत्ते हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार आहेत. Payment of Gratuity Act, 1972 नुसार याआधी 5 वर्षांची सेवा पूर्ण केल्यावरच ग्रॅच्युइटी मिळत होती. मात्र आता FTE कर्मचाऱ्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला त्या कालावधीप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळणार आहे.
इराण- अमेरिका युद्धाने उडणार महागाईचा भडका
आखातात युद्ध पेटलंय. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत.मात्र याचा फटका आता जगभरातल्या सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या तीन देशांमधल्या संघर्षाने जागतिक अर्थव्यवस्थेची झोप उडवलीय. जर हे युद्ध 40 दिवसांपेक्षा जास्त काळ चाललं तर जगात अन्नधान्यांचा तुटवडा आणि महागाईचा भडका उडण्याचा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिलाय.संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेच्या आक़डेवारीनुसार जागतिक अन्नधान्यांच्या किमतींनी गेल्या सहा महिन्यांतला उच्चांक गाठलाय.मुळात या महागाईमागे मुख्य कारण आहे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’…इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे हा जलमार्ग बंद होण्याची भीती आहे. जर इथून कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे थांबला, तर डिझेल-पेट्रोलचे दर आकाशाला भिडतील. त्याचा वाहतूक खर्चावर परिणाम होईल आणि शेतातील अन्नधान्य शहरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च दुपटीवर जाणार. दरम्यान भारत जरी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असला, तरी जागतिक बाजारातील खतांच्या किमती आणि इंधनाचे दर भारतीयांच्या खिशाला कात्री लावणारे ठरतील. अशातच गव्हापासून ते खाद्य तेलापर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमतीत आंतरराष्ट्रीय दबावामुळे वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
इस्रायलचा इराणच्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला
इराण आणि अमेरिका-इस्रायल आघाडी यांच्यातील संघर्षाची आग अधिकच भडकत चालली आहे. इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर (पेट्रोकेमिकल झोनवर) एक मोठा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले असून, इतर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या पेट्रोकेमिकल क्षेत्राचे नेमके किती नुकसान झाले आहे, याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती इराणने अद्याप जाहीर केलेली नाही.इराणनेही एक प्रतिहल्ला केला आहे. इराणने कुवेत येथील एका वीज प्रकल्पावर ड्रोन हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे त्या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे कुवेतला त्या वीज प्रकल्पाचे दोन युनिट्स बंद करावे लागले.
चेन्नईचा सलग तिसरा पराभव
आयपीएल 2026 च्या 11 व्या सामन्यात RCB ने CSK चा 43 धावांनी धुव्वा उडवला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. टीम डेव्हिडच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 250 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांसारखे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दोन सामन्यांत दोन विजय आणि 4 गुणांसह उत्कृष्ट नेट रनरेटमुळे बंगळुरू संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, एमएस धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था खराब झाली असून, त्यांना स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तळाशी आहे.
गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठTop 10 News :
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कॉमेडी किंग गौरव मोरेने गूपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्याचा बायकोसोबतचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे. त्याने आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने इन्स्टाग्राम गौरव आणि त्याच्या बायकोसोबत स्टोरी शेअर केली आहे. गौरव मोरेच्या बायकोचे नाव प्रियांका कारेकर आहे. गौरव आणि प्रियांका अनेक वेळापासून एकमेकांना डेट करत होते. ते अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. गौरव मोरेने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली आहे. ऋतुजाने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे गौरव मोरेचे लग्न झाल्याचे स्पष्ट होते. मात्र अद्याप गौरवने कोणताही अधिकृत माहिती दिली नाही.

