Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Top 10 News : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आज गोठवणार?, गडकरींनी राजीनामा द्यावा आणि "आपला देश कृषीप्रधान कमी, पुरुषप्रधान जास्तय.", वाचा टॉप १० बातम्या

Top 10 News : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आज गोठवणार?, गडकरींनी राजीनामा द्यावा आणि "आपला देश कृषीप्रधान कमी, पुरुषप्रधान जास्तय.", वाचा टॉप १० बातम्या

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Top 10 News : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. मागील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी "आमदार म्हणजे पक्ष नव्हे" असा युक्तिवाद करत शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यास विरोध केला होता. 2022 मधील शिवसेना फुटीनंतर सुरू झालेल्या या वादात आजच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

'ई-२०' हा मोठा गैरव्यवहार”
सपकाळ यांनी मागितला गडकरींचा राजीनामा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या 'ई-20' धोरणावर जोरदार टीका करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे लाखो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या धोरणामागे मोठा गैरव्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने 'ई-20' धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. 'इथेनॉलमिश्रित इंधन मागे घ्या' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

१० जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज ;
हवामान विभागाचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला पाऊस आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई हवामान विभागाने आज 10 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाट परिसरासह यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज व उद्या पावसाची हजेरी राहू शकते. मात्र 6 ऑगस्टपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना रखडलेली शेतीची कामे पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.

मुंबई महापालिका भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा?
112 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? Top 10 News :

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केलेले 112 अधिकारी व कर्मचारी अद्याप सेवेत कार्यरत आहेत. तसेच 68 कर्मचारी चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त झाले आहेत. यात उपअभियंते, सहाय्यक व कनिष्ठ अभियंते, स्वच्छता कामगार, मजूर, मुकादम व शिपाई यांचा समावेश आहे. 2005 पासूनची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. RTI कार्यकर्त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

बिहारला एका चांगल्या नेतृत्वाची गरज
विजयानंतर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

बिहारच्या बँकिपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बालेकिल्ल्यात मिळालेला हा विजय बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जनसुराज पक्षाचा हा पहिलाच विधानसभा विजय असून प्रशांत किशोर प्रथमच आमदार झाले आहेत. विजयाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी हा जनतेच्या बदलाच्या इच्छेचा विजय असल्याचे म्हटले. बिहारला चांगले नेतृत्व, शिक्षण आणि रोजगाराची गरज असून पुढील काही महिन्यांत बँकिपूरमध्ये सकारात्मक बदल दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पेट्रोलव ₹३.५ तर डिझेलवर प्रति लिटर ₹२४ कर
सरकारने घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील 'विंडफॉल टॅक्स'मध्ये मोठी वाढ केली आहे. ३ ऑगस्टपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार पेट्रोलवरील कर प्रति लिटर २.५ रुपयांवरून ३.५ रुपये, तर डिझेलवरील कर १५.५ रुपयांवरून थेट २४ रुपये करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि तेल कंपन्यांना मिळणारा अतिरिक्त नफा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, या वाढीचा परिणाम निर्यात करणाऱ्या तेल कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. मात्र देशांतर्गत बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरांवर याचा तात्काळ थेट परिणाम होण्याची शक्यता नाही.

Old Monk, Bagpiper सह इतर ब्रँडवर बंदी
मद्यपींना मोठा धक्का

अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने ओल्ड मंक, एंटीक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज आणि बॅगपाइपर डिलक्ससारख्या काही मद्य ब्रँडच्या विशिष्ट वेरियंटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तपासात या उत्पादनांमध्ये नियमबाह्य कृत्रिम किंवा 'नेचर-आयडेंटिकल' फ्लेवर वापरल्याचे आढळल्याचा दावा FSSAI ने केला आहे. मध्य प्रदेशात एंटीक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज, बॅगपाइपर डिलक्स आणि ओल्ड कास्क डिलक्स रमच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात उत्पादित ओल्ड मंकच्या तीन वेरियंटवर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नियमांनुसार मद्यामध्ये अशा प्रकारच्या फ्लेवरचा वापर करण्यास परवानगी नसल्याचे FSSAI ने स्पष्ट केले.

पाकिस्तानचे झाले २ तुकडे? ;
शाहबाज शरीफ सरकार हादरले

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पुन्हा जोर आला असून बलुच नेते मीर यार बलुच यांनी 11 ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जगभरातील बलुच नागरिकांना घरे, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणी बलुचिस्तानचा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले. बलुच नेत्यांचा दावा आहे की, 11 ऑगस्ट 1947 रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र दर्जा मिळाला होता, मात्र 1948 मध्ये पाकिस्तानने या प्रदेशावर ताबा मिळवला. तसेच त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. मात्र बलुचिस्तानला कोणत्याही प्रमुख देशाने किंवा संयुक्त राष्ट्रांनी स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिलेली नाही.

ICC ची मोठी कारवाई!
अमेरिकेच्या 'या' खेळाडूवर तब्बल ८ वर्षांची बंदी

क्रिकेटविश्वात खळबळ उडऊन देणारी बातमी समोर आलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकेचा क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी याच्यावर 8 वर्षांची बंदी घातली आहे. अबू धाबी टी-10 लीग 2025 दरम्यान सामना फिक्सिंगचा प्रयत्न, सहकाऱ्याला फिक्सिंगसाठी प्रवृत्त करणे आणि तपासात अडथळा आणणे या आरोपांमध्ये तो दोषी आढळला. हैदराबादमध्ये वाढलेल्या 26 वर्षीय रेड्डीने अमेरिकेसाठी 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ICC च्या निर्णयानुसार 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेली ही बंदी 21 नोव्हेंबर 2033 पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे तो कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळू किंवा क्रिकेटशी संबंधित काम करू शकणार नाही.

“आपला देश कृषीप्रधान कमी, पुरुषप्रधान जास्तय…”
अभिनेता कुशल बद्रिकेचे मोठे विधान Top 10 News :

'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके सध्या 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत त्याने स्त्री भूमिका साकारण्याच्या अनुभवांबद्दल भाष्य केले. "पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून मला घर चालवता आलं," असे तो म्हणाला. अनेक कलाकारांनी नकार दिलेल्या भूमिका त्याच्याकडे आल्या आणि त्या करताना अडचणी आल्या, असेही त्याने सांगितले. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. विजू माने दिग्दर्शित या चित्रपटात संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि अंकुश चौधरी यांच्याही भूमिका आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat