ताज्या बातम्या
ट्रॅक्टर रॅलीत कृषी कायद्यांच्या विरोधातील चित्ररथ; किमान शंभर KM अंतराची असेल 'रॅली'

नवी दिल्ली - शेतकऱ्यांकडून येत्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीत केंद्र सरकारच्या तीन कृषी विषयक कायद्यांच्या विरोधातील चित्ररथांचाही समावेश केला जाणार आहे. तसेच गावातील जीवनावर, शेतकऱ्यांच्या व्यथांवरील चित्ररथांचाही यात समावेश असेल असे एका शेतकरी नेत्याने पीटीआयला सांगितले.
या रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांना या संकल्पनेनुसार ट्रॅक्टर रथ तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या रॅलीत किमान एक लाख ट्रॅक्टर्स सहभागी होतील त्यातील किमान 30 टक्के ट्रॅक्टर्सवर हे चित्ररथ असणार आहेत. महाराष्ट्रातल्या विदर्भातील काही शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी आत्महत्यांवर एक चित्ररथ तयार केला असून त्याचाही या रॅलीत सहभाग असेल.
हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या राज्यातील शेतकरी तेथे होणाऱ्या फळ उत्पादनांच्या संबंधातील माहिती सादर करणारे चित्ररथ सादर करणार आहेत. पंजाब आणि हरियानातील शेतकरी आधुनिक शेतींची माहिती असणारे चित्ररथ सादर करणार आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरला तिरंगा ध्वज लावला जाणार असून त्यात देशभक्तीपर गिते तसेच लोकगीतांचाहीं यात समावेश असणार आहे.
दिल्लीच्या पाच सीमा केंद्रांवरून ही रॅली सुरू होणार आहे. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यानंतर हे संचलन सुरू होणार असून जी ट्रॅक्टर रॅली काढली जाईल त्या रॅलीतून शंभर किमीचे अंतर कापले जाईल असेही या नेत्यांनी सांगितले.
ट्रॅक्टर रॅलीचे सुनियोजित संचलन होण्यासाठी वॉर रूम स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक वॉर रूम मध्ये डॉक्टर्स, सुरक्षा कर्मचारी, सोशल मिडीया मॅनेजर्स अशी किमान चाळीस जणांची टीम असणार आहे. रॅलीच्या परिसरात किमान चाळीस ऍम्ब्युलन्स तैनात ठेवण्यात येणार आहेत.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा