Tuesday, 25 Feb, 6.22 pm प्रभात

मुख्य पान
ट्रंम्प यांच्या पक्षाच्या मी विद्यमान अध्यक्ष; आठवलेंनी असे जोडले 'कनेक्शन'

कोल्हापूर: दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे भारतात स्वागत असल्याचे' आठवले म्हणाले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्यावतीने शिवाजी विद्यापीठ येथे जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाय्यक साधन साहित्य वाटप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले व रतन लाल कटारिया यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. दरम्यान आठवले बोलत होते, डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील', असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतीरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला सामाजिक समतेचा मोठा वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष योजना सुरु केल्या. शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 950 कोटीची तरतूद करण्यात आली असून यातून या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय विभागांनी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषदेने जिल्ह्यात दिव्यांग उन्नती अभियान यशस्वीपणे राबविले असून या योजनेतून दिव्यांगाना उपलब्ध होत असलेल्या साहित्यामुळे त्यांच्या जीवनात उभारी येणार असल्याचे आठवले म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top