Sunday, 24 Jan, 10.29 am प्रभात

मुखपृष्ठ
'त्या' सुपारी किलरचा यु-टर्न, म्हणाला, "मला शेतकऱ्यांनी जे सांगितले तेच मी बोललो."

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा काही केल्या संपत नाही. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी चिघळला आहे. एका सुपारी किलरने शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवले होते, अशी कथित कबुलीही त्याने दिली होती. 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत, त्यात गोंधळ घालण्यासाठी आणि मंचावरच्या 4 शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचाही कट असल्याचा खळबळजनक दावा तरुणाने माध्यमांसमोर केला होता, पण आता मात्र या तरुणाने आपल्या वाक्यावरून यु टर्न घेतला आहे.

शेतकरी आंदोलना दरम्यान,अत्यंत खळबळजनक असे आरोप केल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. याबाबत माहिती देताना सोनीपतचे एसपी जशनदीप सिंह रंधावा म्हणाले, या (कथिक सुपारी किलरने) मुलाने म्हटले होते की राई पोलीस स्थानकातील पोसील इंन्स्पेक्टर प्रदीप, एसएचओकडून त्याला हे काम सोपवण्यात आले होते. ज्यानंतर प्राथमिक चौकशीत ही बाब सिद्ध झाली की प्रदीप नावाचे कोणीही इन्स्पेक्टर या पोलीस स्थानकात किंवा जिल्ह्यातही नाही आहेत'.

पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण सोनीपतचा रहिवासी असून, तो बेरोजगार आहे. चौकशीमध्ये ही बाबही समोर आली आहे की, छेडछाडीच्या आरोपांमुळे शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांसोबत त्याचा वाद झाला होता. त्याला एका कॅम्पमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली, ज्यानंतर त्याला भीती दाखवत अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यास भाग पाडले.

दरम्यान, पोलिसांकडून तरुणाची चौकशी करण्यात आली. क्राइम ब्रांचकडूनही त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथामिक माहितीनुसार हा तरुण 21 वर्षांचा आहे. जिथं आंदोलन सुरु आहे तिथून 50 किमी अंतरावरच्या सोनिपत गावचा रहिवाशी आहे. या तरुणाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय, त्याच्याकडून कुठली हत्यारंही पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळे पोलीस सध्या तरी या षडयंत्राबद्दल काही पुरावे मिळाले नसल्याचे सांगतायत पण पुढची चौकशी सुरु आहे. शेतकरी आणि सरकारमधली चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वळणावर गेली. कारण सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता. पण तोही फेटाळण्यात आला. अशा परिस्थितीत या नाट्यमय आरोपानं सरकार आणि शेतकऱ्यांमधलं वातावरण पुन्हा तापले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top