Udhayanidhi Stalin on Trisha: अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेले तमिळनाडूतील विरोधी पक्ष नेते उदयनिधी स्टॅलिन यांना मद्रास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने पोलिसांना उदयनिधी यांची चौकशी करून त्याच दिवशी जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिस ठाण्यातील चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मंगळवारी सकाळी तमिळनाडू पोलिसांनी द्रविड मुनेत्र कळघम (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांना चेन्नईतील नीलांकरई येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले होते. अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबाबत कथित अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
अटकेची शक्यता लक्षात घेऊन उदयनिधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेत पोलिसांना चौकशीनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे निर्देश दिले.
घराबाहेर तणावपूर्ण वातावरण –
उदयनिधी यांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी पोलिस आणि DMKच्या कायदेशीर पथकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कडेकोट बंदोबस्तात तंजावूरकडे नेले.
“मी कुणाचे नाव घेतले नाही” –
ताब्यात घेतल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यांनी, “मी काहीही चुकीचे बोललो नाही. विजय यांच्याशिवाय मी कुणाचे नाव घेतले का?” असा सवाल केला. तसेच ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप करत, “याचा निर्णय न्यायालय घेईल,” असेही त्यांनी पोलिसांच्या वाहनात बसताना म्हटले.
वादाची सुरुवात कशी झाली?
३ ऑगस्ट रोजी तंजावूर येथे कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर आयोजित निदर्शनांमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या भूमिकेवर भाष्य करत असताना गर्दीतून अभिनेत्री तृषा कृष्णन यांचे नाव घेण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी केलेल्या कथित टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याला महिलांचा अपमान करणारे आणि अश्लील असल्याचा आरोप केला.
नेमकं वक्तव्य काय होतं?
स्टॅलिन यांनी तृषा बाबत थेट वैयक्तिक आरोप केले नव्हते. मात्र, कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तंजावूर येथील सभेत बोलत असताना जमावातून वारंवार “तृषा, तृषा” अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर उदयनिधी “आपल्याकडे पाणी येवो किंवा न येवो, तिकडे मात्र पाणी पोहोचलं पाहिजे… अरे, मी तर कावेरीबद्दल बोललो.” असे द्विअर्थी बोलले होते. दरम्यान, द्रमुकने सर्व आरोप फेटाळून लावलेत. मुख्यमंत्री विजय आणि तृषा यांच्या कथीत नात्याबाबत याचा संबंध जोडला जात आहे.
TVK आणि भाजपचा तीव्र विरोध –
मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षासह भारतीय जनता पक्षानेही उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. TVK नेते आधव अर्जुन यांनी उदयनिधी यांच्यावर टीका करत त्यांना “अश्लील निधी” अशी उपाधी दिली. त्यांच्या मते, उदयनिधी यांनी राजकीय चर्चेची पातळी घसरवली असून महिलांचा अपमान केला आहे.
TVKचे प्रवक्ते फेलिक्स जेराल्ड यांनीही उदयनिधी यांच्यावर निशाणा साधत, “अशा प्रकारचे वक्तव्य ते स्वतःच्या मुलांसमोर करतील का?” असा सवाल उपस्थित केला.
कनिमोळींचा सरकारवर आरोप –
DMKच्या खासदार आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्या आत्या कनिमोळी करुणानिधी यांनीही या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, सरकारला उदयनिधी यांच्याविरोधात कारवाई करायची असेल तर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करावा. मात्र, विरोधी पक्ष म्हणून DMKचा सामना करता येत नसल्याने सरकार दडपशाहीचे मार्ग अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कनिमोळी यांनी पुढे दावा केला की, ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा अधिवेशनात उदयनिधी सहभागी होऊ नयेत, यासाठीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. सरकारची ही भूमिका लोकशाहीविरोधी असल्याचेही त्यांनी म्हटले.

