Thursday, 04 Jun, 7.24 am प्रभात

ताज्या बातम्या
वडूजचे वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टरची चौकशी

सातारा -वडूज (ता. खटाव) येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्‍टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याने एका महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती झाली. ही बाब गंभीर असून अशा डॉक्‍टरांवर कारवाई करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केली. त्यानुसार तीन दिवसांत चौकशी अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी सादर करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी स्थायी समितीच्या सभेत दिल्या.

सातारा जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा बुधवारी अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, संजीवराजे नाईक निंबाळकर, भीमराव पाटील, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख व सदस्य उपस्थित होते.

खटाव तालुक्‍यातील एका महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती झाली ही बाब गंभीर असल्याचे प्रदीप विधाते यांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित महिला वडूज येथील डॉ. कुंभार यांच्याकडे नियमित तपासणी करत होती. त्यांनीही पुढील तपासणी करण्यास नकार दिला. त्यानंतर वडूज ग्रामीण रुग्णालयात संबंधित महिला आल्यानंतर त्याठिकाणी तिच्यावर वैद्यकीय अधिकारी कुंभार यांनी उपचार न करता तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान संबंधित महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती झाली. ही बाब आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने योग्य नाही.

वडूज ग्रामीण रुग्णालयात सर्व यंत्रणा असताना संबंधित महिलेला उपचार का मिळाले नाहीत, असा प्रश्न प्रदीप विधाते यांनी उपस्थित करून संबंधित खासगी डॉक्‍टर व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. अनेक सदस्यांनीही हा मुद्दा उचलून धरत आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे नमूद केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांना याप्रकरणाची तीन दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून करोना उपाययोजनांसाठी 5 कोटी 89 लाख रुपयांची खरेदी झाली. या खरेदीबाबतही सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना विचारणा केली. या सभेत करोना विषाणूबाबत तालुकावार आढावा घेण्यात आला. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला.

कृषी विभागाच्या अतिरिक्त तरतुदीस मान्यता
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना खते, बी- बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यावर्षी खते, बियाणे यांची मागणी वाढल्याने जिल्हा परिषदेने त्यासाठी अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली. या निधीस स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top