Saturday, 05 Oct, 5.46 am प्रभात

मुखपृष्ठ
वाघोलीतील तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक

विवाह वेबसाईटवरून लग्नाच्या अमिषाने तरुणींची फसवणूक

वाघोली- विवाहविषयक वेबसाईटवरून संपर्क साधलेल्या महिलेला आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या वाघोली येथील तोतयास पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच तो सोबत बाळगत असलेले बनावट पिस्तूल (एअर गन) जप्त करण्यात आले आहे.

दीपांकर जळभाजी भद्रे (मुळगाव नांदेड, सध्या रा. वाघोली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या बनावट आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे भाड्याने राहणारा दीपांकर भद्रेने जीवनसाथी डॉटकॉम या विवाह विषयक वेबसाईटवर खाते तयार केले होते. त्यामध्ये नोकरी विषयक माहितीमध्ये त्याने दिल्ली येथे आयएएस अधिकारी असल्याचे नमूद केले होते; मात्र भद्रे हा विवाहित असल्याचे लपवून तसेच आयएएस अधिकारी नसतानाही त्याने विवाहविषयक वेबसाईटवरून तरुणींशी ओळख करून लग्नाची बोलणी केली. त्याचप्रमाणे इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचा गैरवापर करून फसवणूक केली आहे. त्याच्याजवळ बनावट एअरगन सापडल्याने सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला उपनिरीक्षक प्रिया टिळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी खंडणी व अंमली पदार्थ विरोध पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडीक, प्रिया टिळेकर, पोलीस कर्मचारी प्रमोद मगर, संतोष मते, शिवानंद बोले, सचिन कोकरे, फिरोज बागवान, हनुमंत गायकवाड यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top