Sunday, 29 Nov, 7.33 pm प्रभात

ठळक बातम्या
वाईच्या गंगापुरी घाटावरील त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव

त्रिपुरी पौर्णिमेचा पारंपरिक दिपोत्सव पहाणेसाठी वाईतील गंगापूरी घाट पहाण्यास पर्यटक येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे येथे कोणतेही विद्युत उपकरण वापरले जात नाही. घाटावरील कार्यकर्ते दुपारपासूनच घाटावर पणतीमधे तेल घालणे, त्यात वात घालणे या कामासाठी जातात. कालमानानुसार तेल वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने आता मेणाच्या पणत्या वापरल्या जातात. मात्र कोणतीही विद्युत रोषणाई केली जात नाही. तसेच आकाशात दारुकामाची आतषबाजी केली जाते. विशेषत: अग्निबाणांची आकाशातील लढाई पण बघण्यासारखी असते

गंगापुरी घाट हा सर्वात मोठा घाट असून त्याची लांबी 345 फूट असून रुंदी 50 फूट आहे. हा घाट संपूर्ण दगडी आहे. पुढे कृष्णा नदीचे विस्तीर्ण पात्र, दक्षिणेला सुंदर घनदाट झाडी आहे. या घाटाच्या पश्‍चिमेला दुसरे बाजीराव यांचा 80 फूट रुंदीचा घाट असून येथे छोटासा डोह आहे. वरच्या चौथऱ्यावर एक वडाचे नदीवर ओणवे झालेले मोठे झाड होते. मध्यंतरी ते उन्मळून पडले व पुरात वाहून गेले. या घाटाच्या वरच्या बाजूस गंगाधर रास्ते यांनी बांधलेला गढीसारखा वाडा असून त्याला बुरुजही आहेत. ह्या वाड्यात पूर्वी कोर्ट होते. वर्ष 1942 मधे हा वाडा भस्मसात झाला. तेथे आता शासकीय मुद्रणालय आहे
वाड्याच्या दक्षिणेस नदीच्या काठावरच राममंदिर आहे.

मोठ्या घाटाच्या पूर्वेस जेथे उत्सव होतो तो भानू घाट असून नदीच्या काठावर दोन बुरुजही बांधले आहेत. येथे केवलानंद सरस्वती रहायचे .भानू घाटाच्या उत्तरेस 82 फूट लांब व 53 फूट रुंद बांधीव पटांगण असून येथेच कृष्णाबाईचा उत्सव होतो. त्यापलीकडे भाऊ जोशी यांचा घाट आहे. त्याला लागूनच अनगळ वेस आहे. पलीकडे प्राज्ञ पाठशाळेची इमारत दिसते. भानुघाटाला लागूनच उमामहेश्वराचे पंचायतनमंदिर आहे. त्याच्या पूर्वेस भानू वाडा आहे. हे भानू नाना फडणिसांचे भाऊबंध होते.

येथील त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव राज्यात प्रसिद्ध असून तो पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top