Friday, 03 Jul, 3.15 pm प्रभात

महाराष्ट्र
व्हेंटीलेटरसाठी 5 कोटी ; रिमोटची यू बोट, 40 एचपीच्या 25 बोटी देणार- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून जिल्ह्यात कोरोना लढ्याबाबत उत्तम काम केले आहे, असे सांगून कोरोनाशी लढा देण्यासाठी व्हेंटीलेटर आणि आरोग्य विषयक बाबींसाठी 5 कोटीचा निधी देणार आणि संभाव्य पूर परिस्थीतीवर मात करण्यासाठी रिमोटवर आधारित यू बोट आणि 40 एचपी क्षमतेच्या 25 बोटी उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

शासकीय विश्रामगृह येथे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य पूर परिस्थीती, कोरोना साथ रोग प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाय- योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, राजीव आवळे, ऋतुराज पाटील, राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये कोरोनाबाबत आजवर करण्यात आलेल्या उपाय- योजना आणि संभाव्य परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या उपाय- योजनांची आणि तयारीबाबत माहिती दिली.

जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीतील तयारीबाबत त्याच बरोबर उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन गावनिहाय, कुटुंबनिहाय संक्रमण शिबिरांची माहिती पुस्तिकेद्वारे ग्रामस्थांना पोहचविण्यात येणार आहे. प्रत्येक गावात 10 लाईफ जॅकेट देण्यात येणार आहेत. संक्रमण, जनावरांच्या शिबिरांचे नियोजनही करण्यात आले आहे. हे नियोजन करताना कोविड-19 साठी घेण्यात आलेल्या स्थळांचा विचार करुन नव्याने जागांची पाहणी करण्यात आली आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोविडच्या फार मोठ्या संकटाला थोपविण्याचे काम जिल्ह्याने केले आहे. कोरोना लढ्यातील योद्धे अभिनंदनास पात्र आहेत. मृत्यूदर 1.6 टक्के इतका असून, रुग्ण संख्या बरी होण्याच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर आहे. इचलकरंजी येथील आयजीएमसह कोविड काळजी, कोविड आरोग्य केंद्रांसाठी व्हेंटीलेटर, ऑक्सिजनची सुविधा आणि अनुषंगिक आरोग्य बाबींचा समावेश असणारा प्रस्ताव वैद्यकीय अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एकत्रित पाठवावा. 28 प्रकारची एकत्रित चाचणी करणारी किऑस्कची माहिती घ्या असे ते म्हणाले.

संभाव्य पूर परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या प्रत्येकी 25 जवानांची 3 पथके जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार होणारा पाऊस लक्षात घेता पूर स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील धरणात असणारा पाणी साठा मर्यादित ठेवण्याबाबत पाटबंधारे विभागाने कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना देऊन श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासाने मागणी केलेला सुमारे 41 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येईल. जिल्ह्यातील उद्योगांना लागणारे मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे.

खासदार श्री. माने यांनी यावेळी प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी कमी करण्याची मागणी केली. आमदार श्री. जाधव, श्री. आवाडे आणि ऋतुराज पाटील यांनी उद्योग व्यवसायांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणावर भर देणेबाबत तसेच उद्योगांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. आमदार श्री. आवळे आणि खासदार श्री. माने यांनी नुकसान झालेल्या गावात भरपाई देण्याची मागणी केली.

गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांच्या नियोजनाचे कौतुक

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संभाव्य पुराबाबत सादरीकरण करुन करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. त्यांच्या या सादरीकरणात गडहिंग्लज प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केलेल्या नियोजनाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. अत्यंत सुक्ष्म नियोजन केल्याबाबत मंत्री श्री. वडेट्टीवार महोदयांनी त्यांचे यावेळी कौतुक केले. त्याच बरोबर कोविड लढ्यात विशेषत: आरोग्य, पोलीस, महसूल विभागाने चांगले काम केल्याचा उल्लेख करुन पालकमंत्र्यांच्या हस्ते अशा योद्ध्यांचा सत्कार केला जाईल, असेही ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top