Thursday, 10 Oct, 9.30 am प्रभात

मुखपृष्ठ
विद्यार्थी विकास मंडळाला पूर्णवेळ कारभारी

संचालकपदी डॉ. संतोष परचुरे यांची नियुक्ती; कुलगुरू यांनी केली नावाची घोषणा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकपदी प्रा. डॉ. संतोष परचुरे यांची पूर्णवेळ नियुक्‍ती करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना सक्षमपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्‍टोबर 2016 ते जुलै 2019 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) या विभागाबरोबरच विद्यार्थी विकास मंडळाचा अतिरिक्‍त कार्यभार पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दोन्ही विभागाच्या कामाचा खूप ताण वाढल्यामुळे डॉ. देसाई यांनी जूनमध्येच दोन्ही पदांचा राजीनामा विद्यापीठाकडे सादर केला होता. विद्यापीठाने याची दखल घेऊन विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकपदाच्या अतिरिक्‍त कार्यभारातून डॉ. देसाई यांची मुक्‍तता केली होती. त्यानंतर हा अतिरिक्‍त कार्यभार विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. सदानंद भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

जुलैमध्येच विद्यापीठाने संचालकपदी पूर्णवेळ अधिकारी नियुक्‍त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव पात्रताही निश्‍चित करण्यात आली होती. अर्ज दाखल करण्यासाठी एकदा मुदतवाढही देण्यात आली होती. मुदतीत दाखल झालेल्या अर्जांची व कागदपत्रांची प्रशासनाकडून कसून तपासणीही करण्यात आली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अखेर विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकपदी डॉ. परचुरे यांनी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी (दि.9) केली आहे. त्यांची तीन वर्षांसाठी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. परचुरे हे नाशिकमधील मालेगाव येथील पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात सध्या संगीत विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना महाविद्यालयातील अध्यापनाचा वीस वर्षांचा अनुभव आहे.

अभाविपच्या कार्यकर्त्यांचा कुलगुरूंना घेराव
विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकपदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, विद्यापीठाच्या सुट्टीच्या दिवशीही कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना काम मिळावे या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कलगुरुंना आज घेराव घातला.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाला गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सतत वाव देण्यात येणार आहे. जुन्या योजनांबरोबरच काही नवीन योजना राबविण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
- प्रा. डॉ. संतोष परचुरे, नवनियुक्त संचालक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top