Saturday, 18 Sep, 7.53 pm प्रभात

महाराष्ट्र
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून सदाचाराच्या कथा रुजवाव्यात - भगतसिंह कोश्‍यारी

ठाणे - लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी शहापूर तालुक्‍यातील किन्हवली येथे झालेल्या कार्यक्रमात केले.

किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन, पदव्युत्तर शाखेचा शुभारंभ आणि महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचा पायाभरणी समारंभ कोश्‍यारी यांच्या हस्ते झाला. समाजात लहानपणापासून विद्यार्थ्यांवर सदाचाराचे आणि शिष्टाचाराचे संस्कार झाले पाहिजे. चांगले चारित्र्य घडविण्यासाठी लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे आवश्‍यक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

समाजामध्ये महिलांविषयी आदराची भावना निर्माण करतानाच माता- भगिनी या आपला आधार आहे. सामाजिक कार्यामध्ये महिलांना मोठ्या संख्येने सहभागी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्षेत्र कुठलेही असो आजच्या घडीला मुलांपेक्षा मुलीच अग्रेसर असल्याचे कौतुकोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमात राष्ट्रीय छात्र सेना - मंत्री उदय सामंत
राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी करोना काळात कोविड योद्धा म्हणून भूमिका बजावल्याचे सांगत किन्हवली परिसरामध्ये कृषि महाविद्यालय होण्यासाठी सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top