Virat Kohli Overseas Player Troll Response : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात नाबाद ६९ धावांची खेळी करून विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा दाखवला आहे. ५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणाऱ्या मोठ्या लढतीपूर्वी 'किंग' कोहलीने त्याला परदेशी खेळाडू ट्रोल करणाऱ्यांना आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.
गेल्या काही काळापासून विराट कोहली आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये जास्त वेळ घालवत आहे. भारतात मिळणाऱ्या सततच्या प्रसिद्धीमुळे प्रत्येक ठिकाणी चाहत्यांकडून होणारा पाठलाग टाळण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला आहे. मात्र, याच कारणावरून सोशल मीडियावर त्याला ‘ओव्हरसीज प्लेयर’ (परदेशी खेळाडू) म्हणून ट्रोल केले जात होते. यावर आता विराटने मौन सोडले असून मजेशीर पण तितक्याच प्रभावीपणे उत्तर दिले आहे.
“मी परदेशी खेळाडू आहे का?”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हंगामाची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या विराटने विचारले, “लोक मला परदेशी खेळाडू का म्हणत आहेत, हेच मला समजत नाही. तुम्ही खऱ्या परदेशी खेळाडूंना विचारून पाहा, मी त्यांच्यासारखा दिसतो का? मी परदेशी खेळाडू नाही.” विराटने हे उत्तर हसतमुखाने दिले असले तरी, त्याने टीकाकारांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. लंडनमध्ये राहूनही त्याच्या खेळातील धार कमी झालेली नाही, हे त्याने पहिल्याच सामन्यातील मॅच-विनिंग खेळीने सिद्ध केले आहे.
यशाचा ‘विराट’ मंत्र –
आरसीबीने गेल्या हंगामात पहिल्यांदाच आयपीएल चषकावर नाव कोरले होते. यंदा हे विजेतेपद राखण्याच्या जिद्दीने विराट मैदानात उतरला आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, “विजय हा कठोर परिश्रम, त्याग आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे फळ असते. हार तुम्हाला खूप काही शिकवते, पण विजयानंतर मिळणारी प्रेरणा तुम्हाला अधिक चांगले करण्यासाठी प्रोत्साहित करते.” ५ एप्रिलला होणाऱ्या चेन्नईविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात आता विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

