Virat Kohli Record Most Runs against CSK : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील ११ व्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीसाठी विराटने १८ चेंडूत २८ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली.
या खेळीदरम्यान विराटने आयपीएल इतिहासातील एका मोठ्या विक्रमावर आपले नाव कोरले आहे. तो आता आयपीएलमध्ये एका विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
रोहितला मागे टाकत नंबर-१ वर कब्जा –
विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या या खेळीसह आपल्या धावांचा आकडा ११८८ वर नेला आहे. यापूर्वी हा मान रोहित शर्माच्या नावे होता, ज्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ११६१ धावा केल्या आहेत. रोहितने याच हंगामात विराटला मागे टाकले होते, मात्र विराटने अवघ्या काही दिवसांतच आपले अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे.
आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा:
विराट कोहली: ११८८ धावा (विरुद्ध CSK) रोहित शर्मा: ११६१ धावा (विरुद्ध KKR) विराट कोहली: ११५९ धावा (विरुद्ध PBKS) डेव्हिड वॉर्नर: ११३४ धावा (विरुद्ध PBKS)९००० धावांचा टप्पा खुणावतोय!
विराट कोहलीसाठी हा हंगाम वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत त्याने ९७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये ९००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनण्यापासून विराट आता केवळ २४२ धावा दूर आहे. सध्या त्याच्या खात्यात ८७५८ धावा जमा असून, ज्या फॉर्ममध्ये तो आहे, ते पाहता याच हंगामात तो हा ऐतिहासिक टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे.

