Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विशेष : संविधान जागृतीची गरज

विशेष : संविधान जागृतीची गरज

– संतोष थोरातConstitution Day : काही शक्ती अनेक वर्षांपासून आपल्याच देशाच्या राज्यघटनेबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करून विष पेरत आहेत. आज संविधान दिनानिमित्त (Constitution Day) समाजात योग्य जागृतीची खरेच गरज निर्माण झाली आहे.

एखाद्या राष्ट्राची खरी ताकद केवळ त्याच्या सीमा, सैन्य, आर्थिक संपन्नता किंवा तंत्रज्ञानातील प्रगतीत नसते, तर त्या राष्ट्रातील नागरिकांना मिळणारे स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि सन्मान यांमध्ये असते. भारतासारख्या विविध भाषा, धर्म, जाती, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असलेल्या देशाला (Constitution Day) एकसंध ठेवण्याचे कार्य भारतीय संविधान करते. प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी देणारे संविधान हे भारतीय लोकशाहीचे बळ आहे.

संविधानाने आपल्याला (Constitution Day) अधिकार दिले; मात्र त्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीवही करून दिली. त्यामुळे 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त संविधानाचा गौरव करतानाच त्यातील मूल्ये आपल्या आचरणात किती उतरली आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 'माझे संविधान, माझे कर्तव्य' ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजणे हीच काळाची खरी गरज आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालविण्यासाठी स्वतंत्र राज्यघटनेची आवश्यकता निर्माण झाली. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या प्रदीर्घ विचारमंथनानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला. 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जात आहे.

संविधाननिर्मितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ऐतिहासिक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संविधानाला व्यापक वैचारिक दिशा दिली. सामाजिक विषमता, जातिभेद आणि शोषण दूर करून प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा, समान संधी आणि न्याय मिळावा, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. संविधान सभेतील सामूहिक विचारमंथनातून साकारलेल्या या दस्तऐवजात डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व आणि योगदान दिशादर्शक ठरले.

'आम्ही भारताचे लोक' या शब्दांनी सुरू होणारी संविधानाची प्रस्तावना भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य ही राष्ट्राची ओळख सांगताना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी बंधुता यांचा संकल्प त्यात व्यक्त झाला आहे.

ही मूल्ये केवळ संविधानाच्या पानांपुरती मर्यादित न राहता समाजजीवनात प्रत्यक्ष उतरली पाहिजेत. संविधानाने नागरिकांना समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक आणि घटनात्मक उपायांचा असे सहा प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर अनुच्छेद 51-अ मध्ये मूलभूत कर्तव्यांचाही समावेश केला आहे.

संविधानाचा आदर, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान, देशाची एकता-अखंडता जपणे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहतुकीचे नियम पाळणे, पाणी वाचवणे, स्वच्छता राखणे आणि भेदभाव टाळणे अशा दैनंदिन कृतींतूनच संविधानाचे खरे पालन होते.

आज आपला भारत देश विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि डिजिटल क्षेत्रात प्रगती करीत असला, तरी सामाजिक विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीय भेदभाव, धार्मिक तेढ आणि महिलांची असुरक्षितता यांसारखी आव्हाने कायम आहेत. महिलांना शिक्षण, रोजगार आणि सार्वजनिक जीवनात समान संधी मिळण्यासाठी सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ऑक्टोबर 2026 मध्ये कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विशेष सल्लागार सूचना जारी केल्या.

जनजागृती, पायाभूत सुविधा, पोलिसांची भूमिका, पीडितांना सहाय्य, सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध आणि दीर्घकालीन सुधारणा अशा विविध बाबींवर भर देण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांना अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. महिलांची सुरक्षितता हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून समानता, प्रतिष्ठा आणि न्यायाच्या संविधानिक अधिकारांशी निगडित विषय आहे.

डिजिटल युगात अफवा, खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण संदेश वेगाने पसरतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ समाजात तेढ निर्माण करणे नव्हे. माहितीची सत्यता तपासणे, दुसर्‍याच्या मताचा आदर करणे आणि विवेकाने व्यक्त होणे ही जबाबदार नागरिकत्वाची लक्षणे आहेत. मतभिन्नता लोकशाहीची ताकद असली, तरी मतभेदांचे रूपांतर वैमनस्यात होऊ नये.

संविधानिक मूल्यांची पायाभरणी घरातून आणि शाळेतून झाली पाहिजे. संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, शालेय संसद, निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आणि समूहचर्चा यांमधून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही संस्कार रुजविता येतात. शाळेत जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीवरून भेदभाव न करता समान वागणूक मिळाली पाहिजे. शिक्षकांनी संविधानातील मूल्ये स्वतःच्या आचरणातून विद्यार्थ्यांसमोर ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

लोकशाही म्हणजे केवळ मतदान करणे नव्हे. कायद्याचे पालन, सार्वजनिक प्रश्नांबाबत जागरूकता, अन्यायाविरुद्ध आवाज आणि सामाजिक कार्यातील सहभाग हीदेखील नागरिकांची कर्तव्ये आहेत. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सर्वांनी संविधानाच्या चौकटीत आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 26 नोव्हेंबर हा केवळ संविधानाच्या इतिहासाचे स्मरण करण्याचा दिवस नसून आत्मपरीक्षणाची संधी आहे.

जातिभेद टाळणे, स्त्री-पुरुष समानता जपणे, दुर्बलांना मदत करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि सामाजिक सलोखा टिकविणे हीच संविधानाप्रती खरी निष्ठा आहे. देशाचा विकास केवळ उद्योग, रस्ते आणि तंत्रज्ञानातून मोजता येत नाही; तो समाजातील न्याय, समता आणि बंधुतेतूनही मोजला जातो.

संविधान हे केवळ देश चालविण्याचे साधन नाही, तर देश घडविण्याचे सामर्थ्य आहे. त्याने आपल्याला अधिकारांचे कवच दिले आहे, तर कर्तव्यांनी जबाबदारीची दिशा दाखविली आहे. म्हणूनच संविधान दिनानिमित्त प्रत्येकाने एक संकल्प करावा, तो म्हणजे भेदभावमुक्त समाज निर्माण करण्याचा, प्रत्येकाच्या अधिकारांचा आदर करण्याचा आणि स्वतःची कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याचा! संविधानाचे पूजन एका दिवसापुरते न राहता त्यातील विचार आपल्या कृतीतून वर्षभर जिवंत राहिले पाहिजेत.

कारण संविधानाची (Constitution Day) खरी ताकद त्याच्या पानांमध्ये आहेच त्याचबरोबर ते जगणार्‍या नागरिकांमध्येही आहे. संविधान वाचूया, समजून घेऊया आणि आपल्या आचरणातून जगूया; कारण संविधानाचा सन्मान म्हणजेच लोकशाहीचा सन्मान आणि कर्तव्यांचे पालन म्हणजेच राष्ट्रनिर्मितीतील आपले योगदान!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat