Sunday, 12 Jul, 5.23 pm प्रभात

महाराष्ट्र
विविध कार्यक्रमांना हजेरी लावणारा शिक्षकच कोरोनाबाधित ; परिसरामध्ये भीतीचे वातावरण

न्हावरे : मुळचे उरळगाव (ता.शिरूर) येथील असलेले व सध्या शिरूर येथील प्रितम-प्रकाश नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका ४१ वर्षीय शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल आज (दि.१२) दुपारी पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली.

संबंधित शिक्षकावर लोणी काळभोर (ता.हवेली) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी या ४१ वर्षीय शिक्षकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. उपचारादरम्यान त्या शिक्षकामध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे डॉक्टरने शिक्षकाला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला.त्यानंतर शिक्षकाने पुणे येथील शासकीय रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्याचा तपासणी अहवाल आज(दि.१२) दुपारी पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाबाधित शिक्षकाने लग्न समारंभ व दशक्रिया विधी याठिकाणीही हजेरी लावली आहे. अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच सोमवारपासून (दि.१३) उरळगाव व परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top