Walhe Palkhi Sohala - अधिक मास निमित्त वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामदैवतांचा निघालेला पायी पालखी सोहळा रविवारी (दि.३१) सकाळी वाईच्या वेशीवर पोहचला. तदनंतर वाई बाजारपेठेतून छबिना वाजत-गाजत गणपती घाटावर पोहचल्यानंतर मोठ्या उत्साहात कृष्णा नदी पवित्र पाण्याने ग्रामदैवतांस शाही स्नान घालण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथांचा पायी पालखी सोहळा दर तीन वर्षांनी अधिक मास महिन्यामध्ये श्री क्षेत्र वाई (जि.सातारा) येथील कृष्णा नदीवर पवित्र शाही स्नानासाठी जात असतो. यंदा शनिवारी (दि.३०) प्रस्थान झाल्यानंतर ग्रामदैवतांचा पालखी सोहळा बैलगाडीतून वीर, वाठार कॉलनी, भादे, शिवाजीनगर मार्गे खंडाळा येथे मुक्कामी करून रविवारी सकाळी वाईच्या वेशीवर पोहचला.
वाई गावातील बाजारपेठेतून ढोल, ताशा, सनई सवाद्यसह गुलालाची उधळण करीत, ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा जयघोष करीत हा पालखी सोहळा गणेश मंदिराजवळील घाटाकडे आगेकूच करीत होता. फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना गणेश मंदिर घाटावर पोहचल्यानंतर ग्रामदैवतांच्या मुखवट्याच्या मूर्तींना, पवित्र कृष्णा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले.
यावेळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ, काळभैरवनाथ, भवानी माता, मसनेर, खंडोबा, नायकोबा, म्हस्कोबा अशा ग्रामदैवतांच्या पालख्या सहीत मानाच्या कावडी परंपरेनुसार कृष्णामाईच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले. तदनंतर आरती करण्यात आली. ग्रामदैवतेला ग्रामस्थांनी धोंडे पोळ्याचा नैवेद्य अर्पण केला. पौरोहित्य पुजारी सचिन आगलावे यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घरच्या देवाऱ्यातील देवांनाही नदीच्या पाण्याने स्नान घालून पूजन केले.
शाही स्नान सोहळ्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार, सचिन लंबाते, वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, गिरीश पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण, अमोल खवले, गिरीश पवार, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, उपसरपंच सागर भुजबळ, मानकरी आदींसह वाल्हे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी संध्याकाळी छबीना कार्यक्रम पार पडून, मुक्काम करून पालखी सोहळा सोमवारी (दि.१) परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे.

