Thursday, 05 Mar, 8.37 am प्रभात

मुखपृष्ठ
यंदाचा उन्हाळा जाणार लाभदायक

उजनी धरणात 67.51 टक्‍के पाणीसाठा

पुणे - गेल्या वर्षी राज्यात सर्वत्रच अतिवृष्टीने थैमान घातले. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रात शेतकरी, नागरिकांना मोठा फटकाही बसला. पण या पावसामुळे सर्व धरणेही ओव्हरफ्लो झाली. आत्ता पुणे विभागातील सर्वच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदा पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे 110 टक्‍के क्षमतेने पूर्ण भरले होते. त्यामुळे यंदाचा उन्हाळा दोन्ही जिल्ह्याला लाभदायक ठरणार आहे.

सद्या उजनी धरणात 67.51 टक्‍के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी 11.73 इतका पाणीसाठा शिल्लक होता, त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात उजनी धरण या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी तारक ठरणार आहे. यंदा लवकरच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.

त्यामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील शेती पंपांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणणही वाढले असून धरणातील पाणी पातळी दररोज अर्धा टक्‍का एवढी कमी होत आहे.

मागील वर्षी 4 मार्च 2019 रोजी उजनी धरणात 11.73 टक्‍के पाणीसाठा होता, तर यंदा 4 मार्च 2020 रोजी 67.51 टक्‍के म्हणजेच 1024.26 द.ल.घ.मी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

उजनी धरणात यंदा कधी नव्हे एवढा पाणीसाठा असल्याने उजनी पाणलोट क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला, पानशेत, टेमघर, भामाआसखेड, पवना या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गेल्यावर्षी उजनी धरण 110 टक्‍के भरले होते. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

उजनी धरणातून सोमवार (दि.2) पासून उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. परंतु या आवर्तनाचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

काटकसरीमुळे फायदा होईल
उजनी धरणातून सोमवारी (दि. 2) पासून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सध्या उजव्या व डाव्या कालव्यातून 1 हजार क्‍यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उजनीतून पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

उजनी धरणासह इतर धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानीबरोबरच मोठा फायदाही झाला आहे. परंतु यंदा रामभरोसे न राहता शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने वापरुन बचत करावी. त्यामुळे यापुढील काळात पाणी बचतीमुळे फायदा होईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top