Saturday, 15 Feb, 8.27 am प्रभात

मुख्य पान
यवतचे ट्रॉमा केअर सेंटर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

सोलापूर महामार्गावरील प्रवाशांसाठी मरणयातना

यवत -यवत (ता. दौंड) येथील ट्रॉमा केअर सेंटरचे काम पूर्ण झाले आहे. हे सेंटर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ट्रॉमा केअर सेंटर रुग्णांच्या सेवेत लवकरच दाखल होण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे. जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी नुकतीच या ट्रॉमा केअर सेंटरला भेट देत पाहणी केली आहे. यावेळी यवत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सचिन बडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यावेळी उपस्थित होते.

राज्यात व देशात प्रत्येक शंभर किलोमीटर अंतरावर एक ट्रामा केअर सेंटर असावे, असे सरकारचे धोरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर गंभीर अपघात होतात. अशा गंभीर अपघातातील रुग्णांना गोल्डन अवर म्हणजे वेळेत एक तासाच्या आत उपचार मिळाले, तर त्याचे प्राण वाचण्याची संधी असते. अशा अपघातातील गंभीर रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून सरकारने ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती केली आहे.

महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अशा गंभीर अपघातात रुग्णांना पुणे येथे उपचारासाठी हलवावे लागते. सध्या वाहनांची संख्या पाहता पुणे येथे वाहतुकीची समस्या जटील झाली आहे. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठा कालावधी जात आहे. वेळेत रुग्णांना उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अपघात ग्रस्तांना वेळेत उपचार मिळून रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

यवत येथील हे ट्रॉमा केअर सेंटर पुणे-सोलापूर महामार्गालगत असून प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून त्या जागी हे अद्ययावत सेंटरसाठी लागणाऱ्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या आद्ययावत इमारतीच्या कामासाठी जवळपास दीड वर्षाचा कालावधी लागला आहे. या कामासाठी शासनाने 4 कोटी 98 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे 20 बेडचे रुग्णालय होत असून महिलांसाठी 10 व पुरुषांसाठी 10 असे बेड राहणार आहेत. यामध्ये ऑपरेशन थिएटर, एक्‍सप्रेस, पोलीस चौकी यांसह अद्ययावत सेवा राहणार आहे. तसेच हाडाचे, पोटाचे, भुलतज्ञ, ऑपरेशन तज्ज्ञ अशी तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम उपलब्ध राहणार आहे.

जिल्ह्यातील महामार्ग मृत्युचे सापळे
जिल्ह्यातून बाहेर पडणाऱ्या चारही महामार्गावर अपघातांची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी या महामार्गावर सुमारे 15 ते 20 अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. महामार्गाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. त्यावर राज्य शासनाकडून निधी देण्याचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र, अनेकवेळा निधींच्या टंचाईचे तुणतुणे वाजविले जात आहे. त्याचा परिणाम अनेकवेळा आरोग्याच्या सुविधांवर होत आहे. त्यामुळे महामार्गावर अजून किती बळी जाण्याचे वाट पाहणार, असा सवाल संबंधित प्रशासनाला विचारला जात आहे.

येथील ट्रॉमा केअर सेंटरचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या सेंटरसाठी लागणारा स्टाफच्या भरतीचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. त्यासाठी दोन ते तीन महिने कालावधी लागेल. त्यानंतर हे ट्रॉमा केअर सेंटर रुग्णांच्या सेवेत लवकरच सुरु करण्यात येईल.
-डॉ. शशिकांत इरवाडकर, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यवत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top