Dailyhunt
विविधा: प्र. ई. सोनकांबळे

विविधा: प्र. ई. सोनकांबळे

प्रभात 5 years ago

माधव विद्वांस

गुरे-ढोरे सांभाळत ज्यांनी शिक्षण पूर्ण केले असे प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 16 जुलै 1943 रोजी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यातील डोंगराळ भागात असलेल्या सुल्लाळी या गावी झाला. जळकोट तालुका हा 'उंटाचा डोंगरी तालुका' म्हणून ओळखला जातो. या गावात जाण्यासाठी त्यावेळी रस्ताही नव्हता. लहानपणी त्यांच्या माता-पित्याचे छत्र हरवले व बहिणीने यथाशक्‍ती त्यांचा सांभाळ केला.

मुळातच दुष्काळी आणि अविकसित मराठवाड्यातील ग्रामीण भागात त्यांचे लहानपण गेले. त्यांनी गावाकडेच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन ते एम.ए. झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.

सुरुवातीला वेरूळ जवळील गल्ले बोरगाव येथे ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले. वर्ष 1966 मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले व कालांतराने तेथेच इंग्रजी विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि 1988 मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. गुरे-ढोरे राखणारे प्रल्हादजी त्यांच्या कष्टाने प्राचार्य पदापर्यंत पोहोचले. तेथूनच ते निवृत्त झाले. अगदी शालेय जीवनापासून त्यांना लेखनाची आवड होती.

अमेरिकेत गोऱ्यांच्या वांशिक अत्याचाराविरुद्ध जो विद्रोह पुकारला होता त्याचे अभ्यासक डॉ. म. ना. वानखेडे यांनी त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ अस्मितादर्श (त्रैमासिक) मधून झाला. 'आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. या पुस्तकातून त्यांनी ग्रामीण जीवनातील अनुभव सांगितले आहेत. या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. याशिवाय 'असं हे सगळं', 'पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. 'आठवणींचे पक्षी' विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात घेतले गेले.

साहित्य अकादमीने त्यांच्या कार्याची दखल घेत वर्ष 1983 मध्ये पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. 1997 मध्ये शासनाने त्यांचा 'आदर्श शिक्षक' म्हणून गौरव केला तसेच 'बेस्ट सिटिझन' म्हणून सन्मान झाला. औरंगाबादमध्ये झालेल्या तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 'ऑल इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्स' आणि पहिल्या दलित नाट्य महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची नियुक्‍ती झाली होती.

लातूर नगरपरिषदेने प्रा. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता. अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. रयत शिक्षणसंस्थेनेही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.

ते अत्यंत प्रेमळ स्वभावाचे व माणसे जोडणारे होते. त्यांच्या खिशात कायम खडीसाखर असे व समोर भेटण्यास आलेल्या व्यक्‍तीला हसून आपल्या पिशवीतले सुवासिक फूल व खडीसाखर देऊन तोंड गोड करीत व आपलेसे करीत. सोनकांबळे यांनी त्यांच्या चारही मुलांना, डॉ. अश्‍वीन, प्रिशीत, मनोज आणि मुलगी डॉ. चेतना यांना उच्चशिक्षित केले. त्यांचे औरंगाबाद इथल्या हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने वयाच्या 66व्या वर्षी 6 जानेवारी 2010 रोजी निधन झालं. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची प्रतिमा होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat