Monday, 26 Jul, 4.33 pm DG24 News

राजकारण
आ. भास्कर जाधव उद्धट नाहीत; आततायीपणा करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची पोलखोल

मुंबई : राज्यातील विविध भागात गेल्या आठवडाभर झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये मुख्यमंत्री पाहणी करायला गेले असताना घडलेल्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांचा व्हीडिओ व्हायरल होत असून त्यावरुन त्यांची भाषा उर्मट असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात आता, स्वत: चिपळूणमधील त्या महिलेनं स्पष्टीकरण दिल्याने आततायीपणा करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची पोलखोल झाली आहे.

आ. भास्कर जाधव यांनी अरेरावी करून संबंधित महिलेला उद्देशून मग्रुरीची भाषा वापरली असा आरोप काही माध्यम प्रतिनिधी आणि विरोधकांनी केला. याबाबत संबंधित महिला स्वाती भोजने यांनी आज सांगितले की, अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत, हे मला माहिती नाही. भास्कर जाधव काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. त्यांचा आवाजच राऊडी राठोडसारखा असल्यामुळे ते तसं वाटलं असेल. पण, प्रत्येकवेळी ते मदत करतात, सगळ्या व्यापाऱ्यांनाही ते मदत करतात. कालही ते तशाच मदतीच्या भावनेने आले होते, ते काहीही वाईट बोलले नाहीत. त्यांचं बोलणंच तसं आहे. त्यामुळे, चुकीचा अर्थ काढण्यासारखं काहीही नाही.

मी कुठल्याही दबावात हे बोलत नाही, जर दबाव असता तर मी कालच आमदार-खासदारांचा पगार काढला नसता. ते त्यांच्या धावत्या दौऱ्यात आणि आम्ही आमच्या टेंशनमध्ये होतो. त्यातून ते वडिलकीच्या नात्याने असं बोलले, असे स्पष्टीकरण स्वाती भोजने यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान एका महिलेने आमदांराचा २ महिन्याचा पगार फिरवा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्या. अशी मागणी केली होती. "आमदार ५ महिन्यांचा पगार देतील पण त्याने काहीही होणार नाही, बाकी काय, तुमचा मुलगा कुठयं, अरे आईला समजव, उद्या ये" असे अरेरावीच्या भाषेतले उत्तर ठाकरे यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी दिले होते. जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. तसेच त्यांच्यावर माध्यमातून टीकाही होऊ लागली आहे. त्याचे पडसाद राज्यात सर्व ठिकाणी उमटू लागले आहे. पुण्यातही त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

कालच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस, आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस, असं सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा, असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला, अशी माहिती खुद्द भास्कर जाधव यांनी दिली आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एक-एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याच वेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला.बाकी काय. तुझा मुलगा कुठंय. अरे आईला समजव. आईला समजव. उद्या ये. असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

भोजने आणि आमचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. मी सध्या करत असलेले कामच त्यांना उत्तर देईल, कालच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस असं सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: DG24 News
Top