Thursday, 05 Aug, 1.30 pm DG24 News

राजकारण
अमरिंदर सिंग यांना झटका; प्रशांत किशोर यांचा राजकीय सल्लागारपदाचा राजीनामा

जालंधर : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य सल्लगार पदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर त्यांची नियुक्ती यावर्षी २ मार्चला झाली होती. आपल्या पदाचा राजीनामा देताना त्यांनी खासगी कारण पुढे केलं आहे. मात्र, पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशो यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम केलं होतं. ते निवडणूक प्रचारादरम्यान कॅप्टन अमरिंदर यांचे राजकीय सल्लागार होते. प्रशांत किशोर यांच्या प्रचार रणनीतीचा अमरिंदर सिंग आणि काँग्रेसला बराच फायदा झाला आणि परिणामी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत आली होती.

प्रशांत किशोर यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण खासगी असल्याचं सांगितलं आहे. सार्वजनिक जीवनातून काही काळ विश्रांती घेण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं प्रशांत किशोर यांनी अमरिंदर सिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुख्य राजकीय सल्लागारपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिलं आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.

एकीकडे पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू असताना प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा देणं हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकीत कॅप्टन यांना बाजूला करण्यासाठी ही खेळी असल्याचंही सांगितलं जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: DG24 News
Top