Monday, 26 Jul, 12.49 pm DG24 News

होम
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू, असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितलं. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती.

कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच तसे झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. २५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा, असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी केलं होतं.

नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी यांचं सरकार २३ जुलै २०१९ रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त ९९ मतं तर विरोधात १०५ मतं पडली होती. येडियुरप्पा यांनी २६ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: DG24 News
Top