मुख्य पेज
कोरोना लस सुरक्षित,लोकांनी घाबरून जाऊ नये - राजेश टोपे

टीम ई-लोकमान्य | मुंबई- कोरोना लसीची हजारो लोकांवर चाचणी करण्यात आली आहे, त्यामुळे लस घेताना लोकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.लस घेतल्यानंतर काही सौम्य लक्षणे लोकांना दिसू शकतात.लस घेतलेल्या ठिकाणी थोडी सूज वा लालसरपणा येऊ शकतो, पण घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही,असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना प्राधान्य देण्यात आलेले असल्याने सर्व कोविड योद्ध्यांनी आवर्जुन जरूर लस घेऊन जनतेसमोर उदाहरण ठेवावे, अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर फ्रंटलाईन वॉरिअर्सना लस दिली जाईल. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचा समावेश असेल. त्यानंतर सामान्य लोकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की,केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.त्यानुसार,१८ वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महीला, तसेच कोणत्याही ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नाही.
त्यासोबतच लसीकरणात लोकप्रतिनिधींनी मागे राहून आधी कोविड योद्धांना प्राधान्य द्यावे,अशी विनंती करत समाजात चुकीचा संदेश जाईल असे कोणताही लोकप्रतिनिधी वागणार नाही,असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. त्यासोबतच राज्याची टास्कफोर्स पूर्णपणे सक्षमपणाने आपले काम बजावत आहे, अशी ग्वाही राजेश टोपे यांनी दिली.