Tuesday, 07 Jul, 8.10 pm ई-लोकमान्य

महाराष्ट्र राज्य
महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत- उध्दव ठाकरे

टीम ई-लोकमान्य | मुंबई- देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही,महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखविले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले 'महाजॉब्स' हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच,मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर 'महाजॉब्स' नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली.राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या https://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करतांना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले की,पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची.पण,किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही.तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये.या पोर्टलचा नोकरी,रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा.

अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा.हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असेही मुख्यमंत्री या वेळी बोलतांना म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Elokmanya
Top