Thursday, 21 Jan, 7.56 pm Goa Khabar

होम
अभिनय कसा करतात मला माहित नाही मला फक्त जगता येते : थाहिरा चित्रपटाची नायिका

गोवा खबर : "थाहीराच्या आयुष्यात कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे तिला तिच्या बहिणींचे शिक्षण आणि लग्न करण्यास मदत झाली. तिच्या वडिलांच्या कर्जामुळे तिच्या कुटुंबाने त्यांचे सर्व काही गमावल्यानंतर तिने तिच्या कष्टाच्या पैशाने घरही बांधले. "

51 व्या इफ्फी सोहळ्यात भारतीय पॅनोरामा चित्रपट विभागात प्रदर्शित झालेला 'थाहिरा' हा चित्रपट वास्तव आधारित - कठोर परिश्रम करणाऱ्या आणि अंशतः कर्णबधिर असलेल्या आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे आपल्या खांद्यावर उचललेल्या एका महिलेचा जीवन प्रवास आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दीक परावूर, गोवा येथे सुरु असलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सहाव्या दिवशी (21 जानेवारी 2021) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत थाहिरा आणि तिचा नवरा बिछपूची भूमिका साकारणारा दृष्टिहीन अभिनेता क्लिंट मॅथ्यू देखील उपस्थित होते.

थाहीराचे आयुष्य हे अनपेक्षितपणे कलाटणी आणि वळणे घेणाऱ्या एखाद्या चित्रपटासारखे आहे. बहिरेपणा असून देखील तिने आयुष्यात कधीच हार मानली नाही. 50 किलो वजनाचे पशु खाद्याचे पोते आपल्या स्कूटर वरून घेऊन जाणारी थाहिरा हे तिच्या गावातील एक सामान्य दृश्य आहे. याव्यतिरिक्त, ती गावातील महिलांना ड्रायव्हिंग देखील शिकवते.

थाहीराच्या या प्रेरणादायक कथेने सिद्दिकला तिच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण करण्यास आकर्षित केले.

प्रमुख कलाकारांची निवड कशी केली याबाबत परावूर यांनी सांगितले. "मी सुरुवातीला या चित्रपटासाठी नायिका शोधत होतो, परंतु मला अशी कोणीही नायिका मिळाली नाही जी थाहिरासारखे कठोर परिश्रमाची कामे करू शकेल. शेवटी, मी तिलाच या चित्रपटात अभिनय करण्याविषयी विचारले आणि सुरुवातीच्या संकोचा नंतर ती देखील यासाठी तयार झाली."

पत्रकार परिषदे नंतर पीआयबीशी बोलताना नवोदित अभिनेत्री थाहिरा म्हणाली: "थाहिरा ही माझ्या आयुष्याची सत्य कथा आहे; दिग्दर्शक सिद्दिक परावूर यांनी जेव्हा मला या चित्रपटात अभिनय करण्याविषयी विचारले तेव्हा मी त्यांना विचारले की मी चित्रपटात अभिनय करू शकते का? मी सांगितले, अभिनय कसा करतात हे मला माहित नाही मला फक्त जगता येते."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top