Wednesday, 28 Jul, 8.08 pm Goa Khabar

होम
लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचा खून : दिगंबर कामत

गोवा खबर : देशातील प्रत्येक घटनात्मक संस्था नष्ट केल्यानंतर आता भाजप सरकारने विधानसभेत कामकाजात सहभागी होण्याचा आमदारांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला आहे. गोव्यातील भाजप सरकार विरोधकांना तोंड देण्यास घाबरत असुन, आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या सरकारने टाळले आहे. आज मागच्या सत्रात पूढे ढकललेले व आज क्रमांकीत झालेल्या तारांकीत प्रश्नांनाही सरकारने उत्तर दिले नाही यावरुन सरकारला काहितरी लपवायचे आहे हे स्पष्ट होते. भाजप सरकारने लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचा खून केला अशी जोरदार टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली. गोवा विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील कामकाजावर प्रतिक्रीया देताना त्यांनी सरकारला धारेवर धरले.

भाजपने आमची जीवनदायिनी आई म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला हे सत्य आता उघड झाले आहे. जलस्त्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी आज विधानसभेत गोव्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यानी मंत्रीमंडळाची मंजुरी न घेताच कर्नाटक भाजप अध्यक्षांना पत्र लिहील्याचे मान्य केल्याने भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी गोव्याच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले.

गोवा सरकारने म्हादई जलतंटा लवादाचा आदेश अधिसुचीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली त्यावेळी गोव्याच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. मुख्यमंत्र्यानी आज सदर वकील बदलला असे विधानसभेत सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सरकारने सदर वकीलाने कोणाच्या सल्ल्यावरुन घेतली होती या विषयाची सर्व कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवावीत अशी मागणी मी केली आहे. सरकार या सत्रातच सदर कागदपत्रे देणार अशी आशा बाळगतो असे दिगंबर कामत म्हणाले. अर्थसंकल्पावर चर्चा न करताच तो संमत करण्याचा विक्रम भाजप सरकार करणार असुन, इतिहासात त्यांची नोंद राहणार आहे. भाजप सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलले असुन, राज्याचे कर्ज आज २६००० कोटींवर पोचले आहे. राज्यात आर्थिक आणिबाणीची स्थिती असून, प्रत्येकाचे घरगुती बजेट आज कोलमडले आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. विधीमंडळ कामकाज मंत्री माविन गुदीन्हो यांनी कामकाज सल्लागार समितीने चर्चेविनाच अर्थसंकल्प मंजूर करण्यास मंजुरी दिली होती असे खोटे सांगुन विधानसभा सदस्यांचा अपमान केला आहे. मी त्यांचा निषेध करतो असे दिगंबर कामत म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top