Sunday, 12 Jul, 7.42 pm Goa Khabar

होम
सरकारच्या चुकलेल्या प्राधान्यक्रमामुळेच गोवा कोविडच्या विळख्यात:सरदेसाई यांचा आरोप

गोवा खबर:व्यवसायाने डॉक्टर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारच्या चुकलेल्या प्राधान्यक्रमांमुळे आणि गैरव्यवस्थापनामळेच गोवा कोविडच्या खाईत लोटला गेला असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे

अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

सरदेसाई म्हणतात,शनिवारपर्यंत गोव्यात 2368 कोविड प्रकरणे आढळून आली असून त्यापैकी 928 सक्रीय रुग्ण आहेत. शनिवारी 117 नवीन रुग्ण आढळून आले असून आम्ही मागच्या काही दिवसात रुग्णाची शतके पार करत आहोत. शनिवारी तीन आणि रविवारी दोन रुग्णांना मृत्यू आल्याने आत्तापर्यंत मृतांचा अधिकृत आकडा 14 झाला आहे .

सरदेसाई म्हणाले, मी मुद्दामहून अधिकृत असे म्हटले आहे कारण हा आकडा केवळ तपासलेल्या रुग्णांचा आहे. वस्स्तविक न तपासलेले कित्येक रुग्ण आपोआप बरे होण्याची किंवा मृत होण्याची शक्यता असल्याने गोव्यात कोविडमुळे किती लोक मेले हे कळणे कठीण आहे. त्यामुळे सरकारने दिलेली माहिती नाईलाजाने खरी मानावी लागत आहे.

गोवा सरकारने बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या 1428 असे म्हटले आहे, शनिवारी 81 रुग्ण बरे झाल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र त्यापैकी सौम्य , मध्यम व गंभीर किती याचा पत्ता नाही. वास्तविक किमान 10 दिवस निगा केंद्रात असलेल्या आणि तीन दिवस लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांना बरे झाले असे समजण्यात येते पण नव्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांना डिस्चार्ज देताना तपासले जात नसल्याने ते खरेच निगेटिव्ह की नाही हे कळणे कठीण आहे. या रुग्णांना 7 दिवस एकांतवासात ठेवणे आवश्यक आहे. ते खरेच एकांतवासात राहतात का हे पाहण्यासाठी सरकारी यंत्रणा आहे का असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील कोविड हॉस्पिटल आणि निगा केंद्रे यांची परिस्थिती अगदी हालाखीची आहे. या केंद्रात स्वच्छता ठेवली जात नाही. रुग्णांना पौष्टीक अन्न मिळत नाही. सरकारकडे पुरेशी औषधेही नाहीत. त्यांच्या स्वतःच्या आमदाराला वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. हेच सरकार एका महिन्यांपूर्वी गोवा ग्रीन झोन असा टेंभा मिरवीत होते त्यांची सध्या ही परिस्थिती असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

यामुळेच लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. यामुळेच लोक स्वतःहून लॉकडाऊन करू लागले आहेत. ही परिस्थिती पाहिल्यास लोकांनी या सरकारविरुद्ध जणू अविश्वास ठराव आणला आहे असे वाटते असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

ही परिस्थिती पाहिल्यास राज्य कोविडच्या खाईत लोटले जात असून परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सरकारने कचरा प्रकल्प विस्तार, रेल्वे दुपदरीकरण, मरिना या सारख्या प्रकल्पावरील लक्ष बाजूला सारून कोविड विरोधात युद्ध छेडण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रुग्णांना तपासून त्यांच्यावर उपचार याला प्राधान्य देण्याची गरज आहे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची मागणी आम्ही तीन महिन्यापूर्वीच केली होती याकडॆ त्यांनी लक्ष वेधले. हे केले नाही तर गोवा मोठ्या संकटात सापडणार असून त्याला हे गैरव्यवस्थापन करणारे सरकार कारणीभूत असेल असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top