Dailyhunt

आमदार Kisan Kathore यांनी बिल्डरच्या हत्येची सुपारी दिली; गँगस्टर एजाज लकडावालाचा खळबळजनक दावा

मुरबाडचे भाजपा आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी अंबरनाथमधील एका बिल्डरच्या हत्येसाठी आपल्याला सुपारी देण्याची ऑफर वारंवार दिली होती, असा खळबळजनक दावा अंडरवर्ल्ड डॉन एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याने केला आहे.

लकडावालाने यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Ashutosh Dumbre) यांना पत्र लिहिल्याने राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार कथोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत लकडावालाला ओळखत नसल्याचे म्हटले असल्याचे एका इंग्रजी दैनिकात म्हटले आहे.

आर्थर रोड कारागृहात असलेल्या लकडावालाने पत्रात नमूद केले आहे की, २०२३ च्या अखेरीस मुंबई सत्र न्यायालयात हजेरीसाठी आलो असताना आमदारांच्या कथित माणसांनी त्याची भेट घेतली होती. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील (Badlapur Railway Station) जमिनीच्या वादातून बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांना ‘कायमचे संपवण्यासाठी’ कथोरे यांनी त्याला सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता असल्याचे एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे.

लकडावालाच्या दाव्यानुसार, न्यायालयात भेटायला आलेल्या व्यक्तींनी थेट आमदार किसन कथोरे यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून त्याचे बोलणे करून दिले. ‘हे काम कर, तुला हवे तितके पैसे हव्या त्या ठिकाणी मिळतील,’ असे आमिष आमदारांनी आपल्याला दाखवले होते, असा दावा लकडावाला याने या पत्रात केला आहे. मात्र, आपण आधीच तुरुंगात असल्याने ही ऑफर नाकारल्याचेही त्याने स्पष्ट केले.

एका इंग्रजी दैनिकाला प्रतिक्रिया देतांना आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी दावा फेटाळत “मी लकडावाला नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. मला अशा गोष्टी करण्याची गरज नाही. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असे म्हटले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अंबरनाथमध्ये बिल्डर पनवेलकर यांच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नव्हती. आता लकडावालाने केलेल्या या खुलाशामुळे त्या गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे पोलिसांनी यापूर्वी लकडावालाचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे तो होऊ शकला नाही. ‘न्यायालयाने परवानगी दिल्यास मी या संपूर्ण प्रकरणावर माझा अधिकृत जबाब नोंदवण्यास तयार आहे,’ असे लकडावालाने पत्राच्या शेवटी म्हटले आहे. ३० मार्च रोजी टपालाने पाठवलेले हे पत्र आता तपासाची दिशा बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post